🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघ या महिन्याच्या अखेरीस न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ ५ टी-२० सामने, ३ वनडे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. सहा आठवड्यांच्या या दौऱ्यासाठी उद्या रविवारी भारतीय संघाची निवड केली जाणार आहे.
येत्या २४ जानेवारीला भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना होईल. न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड समिती १५ ऐवजी १६ किंवा १७ जणांची निवड करते का हे पहाव लागणार आहे. भारताच्या मुख्य संघासोबतच भारताचा अ संघ देखील न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. त्यामुळे गरज पडली तर निवड समितीकडे खेळाडूंचा पर्याय असेल. भारताच्या अ संघाचा सामना २६ जानेवारी रोजी संपणार आहे.
वनडे आणि टी-२० साठीचा संघ एकच असेल की वेगवेगळा हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे. वनडे संघातून केदार जाधवला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या ऐवजी अजिंक्य रहाणेला संघात स्थान मिळू शकते. मुंबईचा सुर्यकुमार यादव याचा पाचव्या किंवा सहाव्या स्थानासाठी विचार केला जाऊ शकतो. सुर्यकुमार आणि संजू सॅमसन दोन्ही भारताच्या अ संघात आहेत. कसोटी संघात बदल होण्याची शक्यता नाही.
कसोटी मालिकेसाठी गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांच्यासोबत नवदीप सैनीच्या ऐवजी कुलदीप यादवचा विचार केला जाऊ शकतो.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
