🕒 1 min read
मुंबई : आज आपण भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. याच पार्श्वभूमीवर आज देशभरात विविध राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि जेष्ठ नेत्यांचे आभारही मानले. तसेच यावेळी त्यांनी एका मुद्द्यावर भाष्य करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिश्किल शैलीत टोला लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर प्रतिक्रिया देत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आज पंतप्रधानांनी केलेल्या भाषणात शिक्षणाला प्राधान्य, महिला धोरण, विज्ञान क्षेत्राची वाढ, तंत्रज्ञान विकास, श्रद्धा व अंधश्रद्धांबाबत डोळस भूमिका घेण्यात आली. पण या गोष्टींची सुरूवात महाराष्ट्रात झाली याचा अभिमान आहे. हा सगळा विचारांचा वारसा फक्त महाराष्ट्राचा वारसा नाही तर हा पूर्ण देशाचा वारसा आहे. आज संसदेत शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे पुतळे आहेत. त्यांचा उल्लेखही पंतप्रधानांनी भाषणात केला. त्यांनी आज केलेलं भाषण हे महाराष्ट्राचं कौतुक होतं. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या मराठी माणसांनी जे काम केले ते मराठी माणसांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण त्यानंतरच्या मुख्यमंत्र्यांचे नाव मी घेऊ शकत नाही कारण ते अजून कामाला लागलेच नाहीत, त्यांचे काम फोन व व्हीडिओद्वारेच दिसते.”, असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.
तसेच पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, “मेरा भारत महान आहेच, पण ज्या महाराष्ट्राच्या मातीशी आपलं नातं आहे त्याचा ओलेपणा आणि त्या मातीचे कष्ट आपल्याला विसरून चालणार नाहीत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेकांनी योगदान दिलं, खूप पिढ्यांनी महाराष्ट्रासाठी संघर्ष केला, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी सहकार्य केले त्यांचेही स्मरण आपण करायला हवे. तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी व त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसह अनेकांनी योगदान दिले. त्यांच्यामुळे आज आपण हा मोकळा श्वास घेऊ शकतो. इतिहासात अनेक नावं नोंदवलेली आहेत. पण असंख्य कुटुंबं अशी असतील ज्यांची नोंदच नसेल. ज्यांचं नाव कदाचित कुठल्याही इतिहासाच्या पुस्तकात नसेल. पण आपल्या मनाच्या इतिहासात आपण त्यांची नोंद करायला हवी. ज्यांनी ज्यांनी तेव्हा त्याग केला त्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींना आपण नमन केले पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजेत.”
महत्वाच्या बातम्या:
- Supriya Sule | सुप्रिया सुळे यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार! वाचा, नक्की काय आहे प्रकरण?
- Sameer Wankhede । क्लीन चिट मिळाल्यानंतर समीर वानखेडे आक्रमक, नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ
- Abdul Sattar | शेतकरी आत्महत्या ही सर्वात दुर्दैवी बाब – अब्दुल सत्तार
- Santosh Bangar । पहा संतोष बांगर यांची ‘दबंग’ स्टाईल; हॉटेल मॅनेजरच्या कानशिलात लगावल्या
- Chhagan Bhujbal । मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे ‘जय महाराष्ट्र’ म्हणायचे की ‘वंदे मातरम’?; छगन भुजबळांचा टोला


