मुंबई : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
या सर्व परिस्थितीमुळेच शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मोठ विधान केले आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय समिती स्थापन करावी. या समितीच्या माध्यमातूनच कोरोनाची परिस्थिती हाताळली जावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच सद्यपरिस्थितीत सगळ्यांनी एकत्र येऊन राजकारणविरहीत काम केलं तरच हा देश वाचेल. अन्यथा देशात फक्त मुडद्यांचं राज्य राहील, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.
कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती मानून निर्णय घेण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. अनेक राज्यांमधील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनेक गोष्टींवरून केंद्र सरकारला फटकारले आहे. हे आधीच व्हायला पाहिजे होते. महाराष्ट्राला कोरोना लसींचा म्हणावा तसा पुरवठा केंद्राकडून होत नाही. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद करण्याची वेळ ओढावल्याचे राऊत यांनी म्हटले.
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फक्त फटकारून काय साध्य होणार? राष्ट्रीय आपत्ती असूनही केंद्र सरकार त्याकडे गांभीर्याने पाहत नसेल तर हे केंद्र सरकारचं नियंत्रण सुटल्याचं द्योतक आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय स्तरावर एक समिती स्थापन करायला पाहिजे. सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार या राष्ट्रीय समितीच्या माध्यमातून कोरोना परिस्थिती हाताळतील. जेणेकरून कुठल्याही राज्यावर अन्याय होणार नाही. ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि लसींच्या पुरवठ्यावर केंद्र सरकारने योग्य नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले आहे.
दरम्यान, भारतात गेल्या 24 तासात देशात 4,01, 993 नव्या रुग्णांची भर पडली असून 3,523 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी देशात जवळपास तीन लाख रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्या आधी गुरुवारी देशात 3.86 लाख रुग्णांची भर पडली होती. कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जगभरातील एकाच दिवशी वाढणाऱ्या रुग्ण संख्येपैकी 40 टक्के रुग्णसंख्या ही एकट्या भारतात वाढत असल्याचं समोर आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्रातील जनतेची एकजूट व निर्धाराच्या बळावर सीमाभागाचा आणि कोरोनाविरुद्धचा लढा जिंकणारच’
- क्लीन बोल्ड करणाऱ्या नवोदीत हरप्रीत ब्रारला भेटायला गेला कोहली; व्हिडीओ व्हायरल
- आज महाराष्ट्राची एकसष्टी; मुख्यमंत्र्यांकडून हुतात्मा स्मारकाला अभिवादन
- कोरोनाचा हाहाकार पाहता भारतातील प्रवाशांना अमेरिकेतही बंदी
- निर्बंधांमुळे राज्यात रुग्ण संख्या कमी झाली नाही; मुख्यमंत्र्यांनीच दिली कबुली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

