🕒 1 min read
मुंबई : ‘पंतप्रधानांनी सरकार काय करत आहे याबाबत सविस्तर माहिती दिली. जेव्हा देशात एकही कोरोना रुग्ण नव्हता त्याच्या आधीपासूनच आपण देशाच्या बाहेरून येणार्या लोकांची चाचणी सुरू केली आहे. आता सत्य असे आहे की, २१ दिवसांपूर्वी ‘लॉकडाऊन’ सुरू झाले तेव्हा संपूर्ण देशात ५१६ कोरोना रुग्ण होते. ते आता १२ हजारांवर गेले आहेत. दुसरे असे की बाहेरून येणार्या लोकांची चाचणी सुरू केली हे खरे असेल तर ५६ देशांतून लोक दिल्लीतील ‘मरकज’ला पोहोचले कसे? हा प्रश्न आहेच. पंतप्रधानांची कोणी दिशाभूल करीत आहे काय?,” असा प्रश्न शिवसेनेने सामना अग्रलेखातून उपस्थित केला आहे.
वाचा ‘सामना’चा अग्रलेख
राज्यांना कमजोर करून व मुख्यमंत्र्यांची युद्धसामग्री कमी करून कोरोनाशी लढता येणार नाही . राज्यांनीच लढायचे आहे व पंतप्रधानांनी मार्गदर्शन करायचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतात व सांगतात तसेच मोदी आज बोलले. त्यांच्या चेहर्यावर थोडी चिंता होती, पण त्यांनी देशाला विश्वास दिला. हा विश्वास पुढच्या युद्धासाठी महत्त्वाचा. ‘सामना’ करावाच लागेल. म्हणून 21 दिवसांच्या ‘लॉकडाऊन’नंतर ‘सामना’ही मैदानात अवतरला आहे!
21दिवसांच्या बंदमध्ये सहभागी झाल्यानंतर ‘सामना’ महाराष्ट्राच्या सेवेत पुन्हा रुजू झाला आहे. संकटे येतात आणि जातात. ‘महाभारत’ आणि ‘पानिपता’तून उभे राहिलेले हे राष्ट्र ‘कोरोना’विरुद्धच्या युद्धात त्याच जिद्दीने लढताना दिसत आहे. कोरोनाचा हल्ला हा फक्त सर्जिकल स्ट्राईकचा प्रकार नाही. हे संपूर्ण युद्ध आहे. त्यामुळे युद्धाचे जे परिणाम-दुष्परिणाम दिसतात ते या युद्धात दिसू लागले आहेत. एकीकडे लोकांना आधार देण्यासाठी ‘सामना’ पुन्हा मैदानात उतरला असतानाच पंतप्रधान मोदी यांनी जनतेसमोर येऊन ‘लॉकडाऊन’ 3 मेपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशाला उद्देशून जे भाषण केले त्यावर विरोधकांनी अकारण टीका करण्याचे कारण नाही. मोदी यांनी 3 मेपर्यंत ‘लॉकडाऊन’ वाढविले आहे. म्हणजे युद्धाचा कालावधी वाढवला आहे व 130 कोटी लोकांना 3 मेपर्यंत शिस्तबद्ध सैनिकाप्रमाणे घरातच बसून राहावे लागेल. मोदी यांनी एक मार्गदर्शक सप्तपदी जाहीर केली आहे. मोदींचे म्हणणे असे आहे की, ‘लॉकडाऊन’च्या काळात गरम पाणी व काढे प्या. गरिबांना भोजन द्या. कोणालाही कामावरून काढून टाकू नका. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या. अत्यावश्यक सेवेतील लोकांचा सन्मान करा वगैरे वगैरे. पंतप्रधानांचे असे म्हणणे आहे की, नवे कोरोना हॉटस्पॉट बनणे देशाला धोकादायक आहे. पंतप्रधानांनी सरकार काय करत आहे याबाबत सविस्तर माहिती दिली. जेव्हा देशात एकही कोरोना रुग्ण नव्हता त्याच्या आधीपासूनच आपण देशाच्या बाहेरून येणार्या लोकांची चाचणी सुरू केली आहे. आता सत्य असे आहे की, 21 दिवसांपूर्वी ‘लॉकडाऊन’ सुरू झाले तेव्हा संपूर्ण देशात 516 कोरोना रुग्ण होते. ते आता 12 हजारांवर गेले आहेत. दुसरे असे की बाहेरून येणार्या लोकांची चाचणी सुरू केली हे खरे असेल तर 56 देशांतून लोक दिल्लीतील ‘मरकज’ला पोहोचले कसे? हा प्रश्न आहेच.
पंतप्रधानांची कोणी दिशाभूल करीत आहे काय? महाराष्ट्रासारख्या राज्यात काल दिवसभरात 350 नवे कोरोनाग्रस्त सापडले हे चिंता वाढवणारे आहे. देशात बारा हजार कोरोनाग्रस्त आले कुठून व आतातरी हा आकडा खरा आहे काय? याबाबत लोकांच्या मनात संभ्रम दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांचे आजचे भाषण हे अधिक संयमी, जनतेला विश्वासात घेऊन काही सांगू पाहणारे होते. एका वाक्यात सांगायचे तर श्री. उद्धव ठाकरे यांच्या धाटणीचे होते. गोरगरिबांना नोकरीवरून काढू नका हे त्यांचे आवाहन दिलासा देणारे आहे व या गोष्टीकडे सरकारने एका जाणिवेने पाहायला हवे. ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत सरकारपेक्षा जनतेची जबाबदारी जास्त आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्यावर सरकार तुम्हाला फार तर वैद्यकीय सुविधा देऊ शकेल, पण स्वयंशिस्त पाळून लागण होऊ न देणे हे जनतेचे काम आहे. आधीपेक्षा जास्त सावध रहा, असे आवाहन मोदी यांनी केले ते त्यासाठीच. आजही लोकांना ‘सोशल डिस्टन्सिंग’चे महत्त्व समजलेले नाही व अशा लोकांमुळेच कोरोनाचा प्रसार वाढतो आहे. अशी एक बेशिस्त, बेजबाबदार व्यक्ती किमान 500 लोकांच्या जीवनाशी खेळते. इटली, स्पेन, न्यूयॉर्कमध्ये तेच झाले. हे सर्व देश आज पूर्णपणे तिरडीवर झोपून आहेत. त्या रांगेत हिंदुस्थानने उभे राहू नये. लोकांना कामधंद्यासाठी बाहेर पडायचे आहे. हातावर पोट असणार्यांची संख्या आपल्या देशात मोठी आहे. हे लोक रोजच्या रोज कमावतात व स्वाभिमानाने आपली चटणी-भाकरी खातात. त्यांना आता एखाद्या आश्रितासारखे ओशाळवाण्या पद्धतीने सरकारी मदतीसाठी रांगा लावाव्या लागत आहेत. मुलाबाळांचे शिक्षण थांबले आहे. औषधोपचार रखडले आहेत. देशातील ‘तळीराम’ मंडळींनी तर ‘सर्वोच्च त्याग’ केला आहे! हा त्याग म्हणजेच देशसेवा आहे. युद्धभूमीवर सैनिक लढतो, अनेकदा हौतात्म्य पत्करतो. त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी होणारे सगळे भारतमातेचा जयजयकार करतात, पण 3 मेपर्यंत त्रास सहन करणे ही सुद्धा राष्ट्रसेवाच आहे.
हातात बंदूक न घेताही देशासाठी लढता येते व त्याग करता येतो. हा सर्वोच्च त्यागच देशाला वाचवू शकतो. ‘सर्जिकल स्ट्राइक’नंतर झिंदाबादच्या गर्जना करणार्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, याक्षणी आपण प्रत्येकजण सैनिक आहोत. जितके कठोरपणे नियमांचे पालन करू तितक्या लवकर कोरोना विषाणूच्या लढाईत विजय मिळेल. रोज कोरोनाचे रुग्ण वाढत जाणे हे काही चांगले लक्षण नाही. हा मजकूर लिहीत असताना नागपुरात 7 नवे रुग्ण सापडले हे धक्कादायक आहे. नगरमध्ये कोरोनाबाधित वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. जिल्हय़ा-जिल्हय़ांतून अशा बातम्या येणे हे काही चांगले चिन्ह नाही. पंतप्रधान मोदी यांची चिंता समजण्यासारखी आहे. पण मध्यप्रदेशसारखे राज्य कोरोनाविरुद्धच्या लढाईत खूपच मागे पडले आहे व तेथे संपूर्ण सरकार नोकरीवर रुजू होऊ शकलेले नाही. तेथील काँग्रेसचे सरकार पाडून भाजपने आपला मुख्यमंत्री बसवला, पण मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊ शकला नाही. त्यामुळे एकटे शिवराजसिंह चौहानच इकडेतिकडे धावत आहेत. हे राजकारण थोडे पुढे ढकलता आले असते. महाराष्ट्रात पंतप्रधान मदतनिधी की मुख्यमंत्री सहाय्यता निधी असा घोळ घातला गेला आहे. हा गोंधळ टाळता आला असता. राज्यांना कमजोर करून व मुख्यमंत्र्यांची युद्धसामग्री कमी करून कोरोनाशी लढता येणार नाही. राज्यांनीच लढायचे आहे व पंतप्रधानांनी मार्गदर्शन करायचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतात व सांगतात तसेच मोदी आज बोलले. त्यांच्या चेहर्यावर थोडी चिंता होती, पण त्यांनी देशाला विश्वास दिला. हा विश्वास पुढच्या युद्धासाठी महत्त्वाचा. ‘सामना’ करावाच लागेल. म्हणून 21 दिवसांच्या ‘लॉकडाऊन’नंतर ‘सामना’ही मैदानात अवतरला आहे!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
