🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी आज निवडणूक होणार आहे. या पदासाठी शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांचे नाव निश्चित झाले आहे. तर उपसभापतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. सध्या विधान परिषदेचे उपसभापती पद हे रिक्त आहे. त्यामुळे विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर या निवडणुकीची घोषणा करणार आहेत.
तसेच उपसभापतीच्या रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात यावी, यासाठी शिवसेना आणि भाजप युतीने आग्रह धरला होता. आता अखेर ही निवडणूक होणार असून या पदासाठी नीलम गोऱ्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
दरम्यान विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे सभापती पद धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण अर्थसंकल्प जाहीर होते वेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी अर्थसंकल्प वाचन मध्येच थांबवले असे आजपर्यंतच्या इतिहासात कधीच झाले नव्हते. त्यामुळे भाजपकडून रामराजे यांच्याविरोधात विधानपरिषदेत अविश्वास ठराव आणला जाण्याची शक्यता आहे.


