टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रचंड यश मिळवलं. त्यानंतर ३० मे रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची, आणि त्यांच्या ५७ सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात १८ खासदार असलेल्या शिवसेनेला एकच मंत्रिपद मिळालं आणि तेही ‘अवजड’. जास्तीच मंत्रिपद न मिळाल्याने शिवसैनिकांत नाराजी आहे. नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेच्या एकमेव महिला खासदार भावना गवळी यांना लोकसभेचं उपाध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान,लोकसभेचं उपाध्यक्षपद हा आमचा अधिकार आहे असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भाजपनं मित्रपक्ष या नात्यानं निश्चितपणे पूर्ण करायला हवा असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं. संजय राऊत यांच्या वक्तव्यानं युतीमध्ये पुन्हा एकदा धुसफूस जाणवत असल्याचं पाहायला मिळत आहे.
भावना गवळी या शिवसेनेच्या ज्येष्ठ खासदार आहेत. सलग पाच वेळा त्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. सध्या सलग पाचव्यांदा लोकसभेत शिवसेनेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भावना गवळी यांना यंदा मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती. पण, शिवसेनेच्या वाट्याला आलेले एकमेव मंत्रिपद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांन बहाल केले. त्यामुळे भावना गवळी यांची मंत्रीपदाची संधी हुकली आहे. सलग पाचव्यांदा जिंकूनही मंत्रिपद न मिळाल्याने भावना गवळी नाराज होत्या. मात्र, मंत्रिपदाची संधी हुकली तरीही, भावना गवळी यांना लोकसभेचं उपाध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे.
भावना गवळींना हे पद मिळाल्यास, त्या लोकसभेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष बनण्याचा बहुमान मिळवतील.त्यामुळे लोकसभेच्या उपाध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


