मुंबई : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरीशी केल्याने अभिनेत्री कंगना रणौत विरोधात शिवसेने आवाज उठवला आहे. तसेच मुंबईसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे अवमान करण्याऱ्या कंगना विरोधात पक्षभेद विसरून आवाज उठवायला हवा , असे आवाहनही शिवसेनेच्या अग्रलेखातून करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कंगना आणि शिवसेनेचे खासदार संजय यांच्यात कलगीतुरा रंगल्यांचे पाहायला मिळत आहे. कंगनाने मुंबई पोलीस व मुंबई विरोधात केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेकडून जोरदार विरोध दर्शवण्यात येत आहे. आता शिवसेनेने सामानाच्या अग्रलेखातून कंगनाविरोधात सगळ्या पक्षांनी एकत्रितपणे आवाज उठवण्याची मागणी केली आहे.
सामनाचा अग्रलेख
“विरोधी पक्षांकडून सुशांतसिंह राजपूत, कंगना राणावत अशा ‘राष्ट्रीय हितांच्या’ विषयांवर प्रश्न उपस्थित केले जातील. खरे तर ‘मुंबई’ म्हणजे पाकव्याप्त कश्मीर वगैरे विधान करून समस्त मराठी जनांचा, मुंबईसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचा अपमान करणाऱ्या उपऱ्या व्यक्तीविरोधात सभागृहात पक्षभेद मोडून आवाज उठायलाच हवा आणि त्यात विरोधी पक्षनेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. महाराष्ट्र जितका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा आहे, तितकाच तो भाजपचाही असायलाच हवा. महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान ही मंडळी कसा काय सहन करू शकतात? मुंबईत खाऊन, ‘पिऊन’ तरारलेली एक महिला फिल्मी कलावंत मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या टाकते हे सहन करता येणार नाही आणि राज्याच्या विधिमंडळात या प्रकाराची निंदा करायलाच हवी.
विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आजपासून
मुंबईचा व पोलिसांचा अवमान करणाऱया त्या ‘मेंटल’ महिलेस महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे राज्याचे गृहमंत्री ठणकावून सांगत असतील, तर तीच महाराष्ट्राची लोकभावना आहे हे मान्य करावे लागेल. गृहमंत्री देशमुख, मुंबईचे पोलीस आयुक्त व संपूर्ण पोलीस दलावर विधानसभेने विश्वास व्यक्त करणे गरजेचे आहे. मुंबई पोलीस ‘माफिया’ आहेत असे विधान करणाऱ्यांचीच चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी शिवसेनेनं अग्रलेखातून केली आहे.


