अमरावती : एकीकडे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि दुसरीकडेरेमडेसीविरचा काळा बाजार करणाऱ्या रॅकेटचा पीसीआर न मागणे, लोकांसाठी अनाकलनीय आहे. रेमडेसीविर प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात आरोपींची पोलिस कस्टडी न मागितल्यामुळे यात कोण कोण उच्चपदस्थ गुरफटलेले आहेत, याचा तपास न करण्याचा किंवा काही तरी सारवासारव केली जात असल्याची जनभावना निर्माण झाली असल्याचे मत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी व्यक्त केले आहे.
कोरोना लढाईत गंभीर रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरलेल्या रेमडेसीविरचा काळा बाजार करणारे सहा लोकांचे रॅकेट अमरावती पोलिसांनी पकडले हे अभिनंदनीय असले तरी हे प्रकरण गुंढाळण्याची पोलिसांना घाई झाली होती, हे त्यांच्या न्यायालयात घेतलेल्या भूमिकेमुळे स्पष्ट होते आहे. सर्व सामान्य माणसासाठी एक रेमडीसीविर इंजेक्शन मिळवणे दुरापास्त झाले असता एवढे मोठे प्रकरण एका दिवसात गुंढाळले जावे, यावरून मोठ्या संशयाला जागा निर्माण झाली आहे.
कोरोनाची दुसरी लाट आली तेंव्हापासून रेमडेसीविरची मारामार सुरू झाली. त्या क्षणापासून जिल्ह्यात किती रेमडीसीविर येतात आणि त्याचे वितरण कसे करायचे, यावर जिल्हाधिकाऱयांचा ताबा आहे. कोण्याही रुग्णाच्या नातेवाईकाच्या हातात इंजेक्शन दिले जात नाही. डॉक्टरने रेमडीसीविर चे प्रिस्क्रिप्शन लिहून दिल्यानंतर त्या रुग्णापर्यंत इंजेक्शन पोहचवले जाते. मग या रॅकेट मध्ये पोलिसांच्या हाती आलेल्या या सहा लोकांनी रेमडीसीविर कसे व कुठून आणले ? समजा पोलिसांच्या हाती लागलेले इंजेक्शन कुठून आणले, याची माहिती पोलिसांना मिळाली पण असेल. मग ही या सहा लोकांची ही पहिलीच चोरी होती का ? यापूर्वी त्यांनी कितीतरी इंजेक्शन विकले असतील. याचा शोध कोण घेणार ? जिल्हाधिकाऱयांचा कडक पहारा असताना यांच्या हाती इंजेक्शन कसे लागले ? यांनी किती रुग्णांची फसवणूक केली ? ज्यांच्या नावे रेमडीसीविर दिले गेले ते रुग्ण वाचले की मरण पावले ? यापैकी एकही रुग्ण दगावला असेल तर यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला नको का ? पोलिसांच्या हाती जो काही मुद्देमाल लागला त्यावरच पोलीस समाधानी कसे झाले ? चोरांच्या हाती लागलेले रेमडीसीविर कुठल्या रुग्णासाठी राखीव होते ? पोलीस त्या रुग्णांपर्यंत पोहचले का, असे असंख्य प्रश्न जनतेच्या मनात आहेत. लोकांनी एक रेमडीसीविर मिळवण्यासाठी जो काही अतोनात त्रास सहन केला, त्या पार्श्वभूमीवर रेमडीसीविरचा काळा बाजार हे प्रकरण अमरावती पोलिसांनी गंभीरतेने घेतले नसल्याचे त्यांच्या कृतीवरून दिसून येत असल्याचा ठपका शिवराय कुळकर्णी यांनी ठेवला आहे.
या कारवाईत सहा लोक पोलिसांच्या हाती लागले. हे सहाही जण एका ठिकाणचे नाहीत. पैकी दोन डॉक्टर्स आहेत. प्रकरणात संजीवनी हॉस्पिटलचे नाव आले आहे, ते डॉ. पवन मालसुरेच्या नावावर नसले तरी तोच चालवतो. अन्य चार लोक विविध ठिकाणचे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून रुग्णाच्या नावे राखीव केलेले रेमडीसीविर काळ्या बाजारात आले, ते कोणत्या रुग्णाच्या वाट्याचे होते ? आपल्या कस्टडीतील रुग्णाचे इंजेक्शन त्या पर्यंत पोहचले, जे संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांना आणि रुग्णालय प्रमुखाला कळले नाही का ? डॉ. चोरडिया यांच्या महावीर हॉस्पिटलमध्ये काम करणारा व्यक्ती कोण्या तरी रुग्णाचेच इंजेक्शन पळवतो, हे डॉक्टरांना समजले नाही का ? डफरीन, इर्विन येथील आरोपींना रेमडीसीविर कोण पुरवत होते ? या संपूर्ण प्रकरणाचे ऑडिट करावे, असे पोलिसांना वाटले नाही का ? सर्व अंगाने तपास न करता हाती लागले तेवढ्याच रेमडीसीविर पुरते हे प्रकरण असल्याचे सांगून प्रकरण आवरते घेतला जात असल्याचा आरोप शिवराय कुळकर्णी यांनी केला आहे. डॉ. पवन मालसुरे कोणाचा माणूस आहे, हे तिवसा येथील सामान्य माणूस देखील सांगतो. यातील मोठे मासे वाचवण्यासाठी प्रकरण गुंढाळले जात असल्याचा जनतेला संशय आहे. या संपूर्ण प्रकरणाचे ऑडिट, तपासणी झाली नाही. यात कोणाकोणाची मिलीभगत आहे, हे सखोल तपासण्याची गरज शिवराय कुळकर्णी यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- बाप होण्याआधी पॅट कमिन्सनं गर्लफ्रेंडला दिलं 70 कोटींचं गिफ्ट
- केंद्र सरकारच्या या पुढाकाराने मराठा आरक्षणास मोठी मदत मिळेल – चंद्रकांत पाटील
- ‘ई-पास’ शिवाय गोव्याला चाललेल्या पृथ्वी शॉला आडवलं पोलिसांनी ; पहा काय आहे प्रकरण
- फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार – देवेंद्र फडणवीस
- कोरोना वरील विजयाचा दिवस हाच साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस असेल – धनंजय मुंडे


