🕒 1 min read
सिंधुदुर्ग : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर राज्यात कधीही अपेक्षित नसणारी राजकीय आघाडी झाली. शिवसेनेनं भाजपची साथ सोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडीची स्थापना केली. हे सरकार आल्यानंतर कधी काळी मैत्री असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला पाहायला मिळालं आहे.
शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत संघर्ष वाढला आहे. तर, दुसऱ्याबाजूला शिवसेना-भाजप यांच्या युतीच्या चर्चा देखील जोरात सुरु आहेत. नेत्यांच्या भेटीगाठी देखील सुरु आहेत. अशातच, भाजप आमदार नितेश राणे यांनी एका कार्यक्रमात केलेलं विधान आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी त्यांची पाठ थोपटल्याने अनेक तर्क लावले जात आहेत.
यावर आता भाजप नेते निलेश राणे यांनी भाष्य केलं आहे. ‘नितेश राणे हे पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी त्या कार्यक्रमात जे विधान केलं ते कोणत्या हेतूने केलं हे मला माहित नाही. कदाचित शिवसेनेला युती हवी असेल. भाजपला युती हवी आहे असं कोण म्हणतंय ?,’ असं निलेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं होतं ?
सिंधुदूर्गमध्ये सागररत्न बाजपारपेठेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेनेचे नेते दीपक केसरकर, विनायक राऊत, नितेश राणे उपस्थित होते. हे नेते एकाच मंचावर येणार असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. दरम्यान, ‘पक्षाच्या नेतृत्वाने आदेश दिल्यास आम्ही खांद्याला खांदा लावून काम करु,’ असं विधान नितेश राणे यांनी आपल्या भाषणात केलं.
‘सिंधुदूर्ग जिल्हा, कोकण आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणासोबतही एकत्र काम करण्याची वेळ आली आणि आमच्या पक्षनेतृत्वाचा आदेश आला तर आम्ही सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करु,’ असं नितेश राणेंनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, ‘काही दिवसांपूर्वी राज्यात युतीची चर्चा सुरु होती, ती नंतर बंद झाली. पण आता भाजपा आणि शिवसेनेचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याने युतीचे चाहते सुखावले असतील. आज रात्री त्यांना चांगली झोप लागेल.’ त्यांच्या या भाषणानंतर उपस्थितांमध्ये कुजबुज सुरु असतानाच राणे आपल्या जागेवर जाऊन बसले आणि विनायक राऊत यांनी त्यांची पाठ थोपटली. त्यामुळे युतीबाबत अजूनही दोन्ही पक्षांमधील काही नेते हे इच्छूक असल्याचे तर्क लावले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदी सरकारच्या काळात इतके भ्रष्टाचार बाहेर निघाले तरी अण्णा हजारे गप्प का ?’
- राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील महिला असुरक्षित – वनीथा श्रीनिवासन
- मोठी बातमी : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर पोहचले राहुल गांधींच्या भेटीला
- ‘पडळकरांनी पात्रता ओळखून भाष्य करावं, तोंडाला येईल ते बोलून स्वतःचा पचका करून घेऊ नये’
- भुमरेंनंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ, शेत बळकावल्याचा महिलेचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
