मुंबई : महाराष्ट्रात बंडखोर आमदारांनंतर आता खासदारांना शिंदे गटात जाण्यापासून रोखण्यासाठी शिवसेना सावध झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बुधवारी खासदार भावना गवळी यांच्या जागी राजन विचारे यांची लोकसभेतील पक्षाचे प्रमुख व्हिप म्हणून नियुक्ती केली, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. त्याचबरोबर माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांनीही शिवसेनेचा राजीनामा दिल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते आता एकनाथ शिंदे गटात सामील होऊ शकतात.
राऊत यांनी संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “तुम्हाला कळविण्यात येते की, शिवसेना संसदीय पक्षाने खासदार (लोकसभा) भावना गवळी यांच्या जागी राजन विचारे, खासदार (लोकसभा) यांची लोकसभेत मुख्य व्हीप म्हणून नियुक्ती केली आहे.”
भावना गवळी महाराष्ट्रातील यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीदरम्यान शिवसेनेने भाजपसोबत पुन्हा युती करावी, असे सुचविणाऱ्या शिवसेनेच्या खासदारांपैकी त्या एक आहेत.
आनंदराव अडसूळ यांनी पक्षातून राजीनामा दिल्यावर संजय राऊत म्हणाले की, “त्यांच्याविरोधात ईडीची चौकशी सुरू असल्याचे मला समजले आहे. गेल्या वर्षी त्यांच्या निवासस्थानावरही ईडीने छापे टाकले होते. यामुळे त्यांच्यावर शिवसेनेचा राजीनामा देण्याचा दबाव असू शकतो. असा दबाव अनेक नेत्यांवर आहे. आनंदराव अडसूळ हे एकनाथ शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :


