अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर शहरातील खड्ड्यांमुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. खड्ड्यांमुळे अहमदनगर शहरातील रस्ते अतिशय खराब झाले असून ते दाखविण्यासाठी शिवसैनिकांनी थेट महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनाच नगर शहरात पायी फिरवले.
महापालिका आयुक्तांसह अधिकार्यांना बरोबर घेत शिवसैनिकांनी शहरातील विविध ठिकाणचे खड्डे दाखविले. तसेच काही खड्ड्यामध्ये फुले व हार घालून पूजा करीत गांधीगिरी करण्यात आली. दरम्यान, यावेळी शिवसैनिकांनी महापालिका प्रशासन तसेच महापौर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मागील दहा ते पंधरा दिवसांपासून शहरात सतत पाऊस पडत असल्यामुळे रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना प्रवास करताना कसरत करावी लागत असून अपघात सुद्धा होऊ लागले आहे. अखेर शिवसेनेने काल आक्रमक होत चक्क मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनाच खड्डेमय रस्त्यांवरून पायी फिरवले. तसेच येत्या आठ दिवसात हे खड्डे बुजवले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी शिवसैनिकांनी दिला आहे.
विशेष म्हणजे या आंदोलनात शिवसेनेचे सर्व नगरसेवक सहभागी झाल्याने वाद मिटल्याचा संदेशही या निमित्ताने देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव यांच्यासह अनेक शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.
महत्वाच्या बातम्या :-
- अमरावतीतील डॉक्टरांच्या अमूल्य योगदानासाठी पालक मंत्र्यांनीमानले आ
- चक्रीवादळाचा फटका बसलेल्या शेतांचे तात्काळ पंचनामे करण्याचे ‘या’ आमदाराचे निर्देश
- ‘माँ’ तुम्ही आम्हाला पोरकं केलंत ; सुबोध भावे झाले भावुक
- श्रीगोंदे तालुक्यासाठी वरदान ठरलेले विसापूर धरण ओव्हर-फ्लो
- लोकशाहीमध्ये डोक्यांवर बंदुका ठेवून मार्ग काढायचे नसतात : संदीप देशपांडे


