टीम महाराष्ट्र देशा : राज ठाकरे यांची लोकप्रियता आणि त्यांच्या सभांना नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद याची कुठेतरी कॉंग्रेस आघाडीला नोंद घ्यावी लागेल असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या वेळेस आघाडीत घेण्याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी प्रत्यक्षरित्या सहभाग नघेता भाजप विरोधी प्रचाराचा धडाका लावला होता. आपल्या मनसे च्या व्यासपिठावरून राज ठाकरे यांनी मोदी आणि शाह या जोडगोळीला पुन्हा सत्तेवर आणू नका असे आवाहन जनतेला केले. राज यांच्या या प्रचार सभांचा फायदा काहीसा कॉंग्रेस आघाडीला होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज यांच्या या भूमिकेची आणि जन प्रतिसादाची कॉंग्रेस आघाडीने विधानसभेला कुठेतरी नोंद घ्यावी लागेल असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.
यावेळी पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेचे राज्यातील सरकार घालविण्यासाठी जी समीकरणे जुळवावी लागतील, त्याचा विचार केला जाईल. तसेच राज ठाकरेंना ज्या प्रकारे तरुण पिढी, नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला राज ठाकरेंना मिळत असलेल्या प्रतिसादाची नोंद नक्की घ्यावी लागेल. असे पवार म्हणाले.
यावेळी पवारांनी शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर देखील भाष्य केले. पवार म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहायचे, ते आपला शब्द पाळायचे. परंतु पंढरपूरच्या सभेत भाजपसोबत युती करणार नसल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली होती. मात्र आपली भूमिका बदलत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने भाजपसोबत युती केली. त्यामुळे शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

