मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला ५ जून रोजी होणारा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित कऱण्यात आल्याचे सांगितले होते. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याला उत्तर प्रदेशातून विरोध झाला होता. उत्तर प्रदेशातले खासदार बृजभूषण सिंह यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येमध्ये पाऊल ठेवू देणार नसल्याचे ठणकावून सांगितले. यासाठी त्यांनी मोठे आंदोलन उभारले होते. आपल्या अयोध्या दौऱ्याला होणारा विरोध म्हणजे एक सापळा आहे. या सर्व गोष्टींसाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेल्याचा आरोप राज ठाकरेंनी पुण्यातल्या सभेतून केला होता. आता याच आरोपा संबंधित संकेत देणारे फोटो मनसेकडून जाहीर करण्यात आले आहेत.
मनसेकडून जाहीर करण्यात आलेल्या या फोटोंमध्ये उत्तर प्रदेशातले खासदार बृजभूषण सिंह हे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात दिसत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत ते मंचावर बसलेले दिसत आहेत. सुप्रिया सुळेंसोबतचा बृजभूषण यांचा एक फोटोही दिसून येत आहे. मनसेचे पदाधिकारी सचिन मोरेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. ‘कुछ फोटो अच्छे भी होते है और सच्चे भी होते है’, असं सूचक कॅप्शनही या फोटोंना दिलं आहे.
कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है…@RajThackeray @BalaNandgaonkar @abpmajhatv @lokmat @mataonline @zee24taasnews @SandeepDadarMNS @ABPNews pic.twitter.com/Esic3lcn2Y
— Sachin Maruti More (@mnsmoresachin) May 23, 2022
मनसेचे मुख्य प्रवक्ते गजानन काळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. सूज्ञास अधिक सांगणे न लगे, असं सूचकपणे त्यांनी म्हंटले आहे. अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली जात असल्याच्या आरोप राज ठाकरे यांनी केला होता. याच संदर्भाने काळे म्हणाले की, जेव्हा शरद पवारांबद्दल केतकी चितळे बोलली तेव्हा, त्याआधी जेव्हा दिल्लीतल्या दुर्दैवी प्रसंगाला त्यांना सामोरं जावं लागलं तेव्हाही राज ठाकरे सगळे मतभेद विसरून पवारांच्या बाजूला उभे राहिले. या गोष्टींविरोधात भूमिका घेतली. मात्र आता राज ठाकरेंच्या बाबतीत असं होताना दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात चुकीचे पायंडे पडत आहेत हे राज ठाकरेंचं म्हणणं अगदी बरोबर आहे, असेही काळे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

