पुणे : वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प तळेगावला येणार होता. त्याची चर्चाही झाली होती. राज्य सरकारने जे आवश्यक आहे त्या निर्णयाची तयारी ठेवली होती. नंतर यात बदल झाला आणि त्यात आता काही पर्याय मला दिसत नाही. काही लोक म्हणतात हा निर्णय बदलून प्रकल्प महाराष्ट्रात आणला पाहीजे. मात्र हे काही होणार नाही. खरंतर हा प्रकल्प बाहेर जायला नको होता पण आता गेल्यानंतर त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारला टोमणे देखील मारले.
शरद पवार म्हणाले, “दोन गोष्टी निदर्शनास आल्या की, मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री या दोघांचे स्टेटमेंट होते की मागील सरकारच्या काळात या प्रकल्पावर निर्णय घेतला नाही. त्यामुळे याला उद्धव ठाकरे यांचे सरकार जबाबदार आहे. खरंतर उद्धव ठाकरे सरकारमध्ये एकनाथ शिंदे मंत्री होते, उदय सामंत हेही मंत्री होते. त्यामुळे हे दोघेही ज्या मंत्रिमंडळात मंत्री होते त्या मंत्रिमंडळाने याकडे दुर्लक्ष केलं, तेच असे आरोप करत आहेत. हे काही शहाणपणाचं लक्षण मला वाटत नाही.”
गुजरातला लाभ मिळाला-
“पंतप्रधानांशी भेट घेतल्यानंतर ते या प्रकरणात मदत करणार असल्याची माहिती मिळाली. ही आनंदाची गोष्ट आहे. पण या प्रकल्पासारखा मोठा प्रकल्प आम्ही महाराष्ट्राला देऊ, हे लहान मुलाची समजूत काढावी असे आहे. त्याच्यात महाराष्ट्राची काही प्रतिष्ठा नाही. त्यामुळे यावर चर्चा न केलेली बरी. साधारणत: केंद्रात पक्ष सत्तेत असल्याचे परिणाम काही राज्यांना अनुकूल होत असतात. त्यामध्ये गुजरातला लाभ मिळाला असेल तर आपण तक्रार करण्याचे कारण नाही. पंतप्रधान मोदी, अमित शाह तिथे आहेत,” असे शरद पवार म्हणाले.
नरेंद्र मोदींना घरची ओढ-
“ज्यांच्या हातात देशाची सूत्रं आहेत त्यांनी थोडबहुत लक्ष जर गुजरातकडे दिलं तर आपण समजू शकतो. मोदी साहेबांचे दौरे पाहिले तर जास्तीत जास्त ते कोणत्या राज्यात जातात हे आपण पाहतो. साहजिकच कोणत्याही माणसाला घरची ओढ असते,” असा टोला शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना लगावला.
विचार मांडण्याऐवजी एकमेकांचे वाद काढले जात आहेत-
शरद पवार म्हणाले, “राज्यकर्त्यांनी राज्याचा विचार मांडण्याऐवजी एकमेकांचे वाद सातत्याने काढले जात आहेत. माझ्या मते सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी दुषणं, वाद बंद करायला हवे आणि सगळ्यांनी महाराष्ट्रातील वातावरण कसे सुधारेल, विकासाच्या दृष्टीने आपण कसे पुढे जाऊ यावर लक्ष केंद्रीत केले पाहीजे. राज्यात सत्तेत असताना मला मंत्रालयात देशातील आणि देशाबाहेरील गुंतवणुकदारांशी बोलण्यासाठी दोन तास वेळ काढायला लागायचा. महाराष्ट्रात येणाऱ्या नवीन गुंतवणुकदारांशी संवाद साधणं, त्याच्या शंका असतील त्या दूर करणं, हे काम व्हायचे. महाराष्ट्रात गुंतवणुकीचे वातावरण होते. हे वाद थांबवून आज ते वातावरण नव्याने निर्माण करूया.”
‘खोका’ हा नवीन शब्द प्रचलित झाला-
“महाराष्ट्रात अलीकडे ‘खोका’ हा नवीन शब्द प्रचलित झाला आहे. कुठेही गेलं तरी लोकप्रतिनिधींबद्दल खोका असा शब्द आम्ही ऐकला नव्हता. आता महाराष्ट्रात ही नवी संकल्पना आली आहे. हे महाराष्ट्रापुरते आहे का तर त्यासाठी देशाचा नकाशा पाहावा लागेल. संपत्ती आणि सत्तेचा वापर करून स्थिर सरकार अस्थिर करायचे आणि त्यातून आपल्याला हवे तसे सरकार बनवायचे हे आपण गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये पाहीले. हा नवीन कार्यक्रम केंद्रातील सत्ताधारी पक्षाने आपल्या हाती घेतला आहे. जो यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात नव्हता,” असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
सहकाऱ्यांना संतुष्ट ठेवणे राज्यकर्त्यांचा विचार आणि अजेंडा-
“सध्याच्या राज्यकर्त्यांचा विचार आणि अजेंडा हा त्यांच्या सहकाऱ्यांना संतुष्ट ठेवणे हा दिसतोय. यातून वेळ मिळाला तर नवरात्र, गणपती उत्सवाकडे लक्ष केंद्रीत करणे हा सध्याच्या सरकारच्या धोरणाचा भाग दिसतोय. लोक त्यासंबंधी काय करायचं ते पाहतील”, असे म्हणत शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
महत्वाच्या बातम्या :
- Best 5G Smartphones | ‘हे’ आहेत 40,000 रुपयांच्या रेंज मधील अप्रतिम 5G स्मार्टफोन.. जाणून घ्या!
- PM Kisan Maandhan Yojana | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; ‘या’ योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सरकार दरमहा 3000 रुपये देणार.. जाणून घ्या!
- Devendra Fadanvis | “…म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ‘वेदांता’ प्रकल्प गुजरातला दिला”
- Ajit Pawar | “तुझ्या बापाच्या घरचं आहे का?” ; अजित पवार शिंदे गटातील आमदारांवर बरसले
- Eyes Hacks | ‘या’ मसाज पद्धतींनी डोळ्यांखालील सूज दूर करा, जाणून घ्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

