नाशिक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. आज दिवसभर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या नेत्यांनी राज्यपालांना खडे बोल सुनावले. एवढेच काय तर खुद्द भाजप नेत्यांनीही त्यांच्या विधानाला असहमती दर्शवली. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत राज्यपालांवर निशाणा साधला आहे. “राज्यपालांच्या डोक्यावरच्या टोपीचा रंग आणि त्यांच्या अंतःकरणाच्या रंगात काही फरक नाही”, अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.
शरद पवार यांच्याशी एका खासगी वृत्तवाहिनीने संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले कि, “या राज्यपालांबद्दल काय बोलायचं हे सांगणं कठीण झालं आहे. याच्या आधीही त्यांनी महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल असंच एक भयानक स्टेटमेंट केलं होतं. आताही तशाच प्रकारच्या स्टेटमेंटची पुनरावृत्ती केली. मुंबई आणि महाराष्ट्र हा सर्व जातीच्या, धर्मांच्या लोकांना घेऊन पुढे जाणारं राज्य आहे. त्यामुळे इथे जी काही मुंबईची प्रगती झाली आहे ती सर्वसामान्य माणसाच्या कष्टातून झाली, घामातून झाली आणि असं असताना अशा प्रकारची विधानं करणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही. परंतु मी त्याच्या फार खोलात जात नाही. कारण राज्यपालांच्या डोक्यावरच्या टोपीचा रंग आणि त्यांचे अंतःकरण याच्यात काही फारसा फरक नाही.”
मुख्यमंत्र्यांची असहमती
राज्यपालांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, “राज्यापालांचं विधान वैयक्तिक, त्याच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचं योगदान कोणीही नाकारू शकत नाही. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबई मिळाली. बाळासाहेब ठाकरेंचं योगदान सर्वांना माहीत आहे. उपमुख्यमंत्र्यांनी खुलासा केला. राज्यपालांनीही खुलासा केला आहे. राज्यपाल हे मोठं पद आहे. संविधानिक पद आहे. त्यामुळे कुणाचा अवमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मराठी माणसाच्या त्याग आणि योगदानाची अवहेलना करता येणार नाही.”
राज्यपालांचे स्पष्टीकरण
“केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही”, असे स्पष्टीकरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sushma Andhare | राज्यपालांवर राज्यापेक्षाही भाजपला सांभाळण्याचीच जबाबदारी जास्त- सुषमा अंधारे
- Supriya Sule | बहोत हो गया, राज्यपालांना उत्तराखंडला परत पाठवा – सुप्रिया सुळे
- Rupali patil | भगतसिंह कोश्यारी चले जाओ- रूपाली पाटील-ठोंबरे
- Eknath shinde | “मी मुलाखत दिली तर राज्यात भूकंप होईल”; एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
- Bhagat Singh Koshyari । मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा हेतू नव्हता; वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपालांचे स्पष्टीकरण


