अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले मुळा धरण मागील दोन दिवसांपूर्वी ओव्हर-फ्लो झाले. मुळा धरणाच्या सर्व अकरा दरवाज्यातून जायकवाडीकडे पाणी सोडण्यात आले आहे. धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे या भागात आता पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. मात्र, यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्यामुळे प्रशासनाने या भागात कलम १४४ लागू केला आहे. मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना वगळता इतरांना या भागात जाण्यास निर्बंध असणार आहेत.
मुळा धरणाच्या पाण्यामुळे लाखो हेक्टर जमीन ओलीताखाली येते. अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण म्हणून मुळा धरण ओळखले जाते. मुळा धरणातून पाणी सोडल्यानंतर हे दृश्य पाहण्यासाठी येथे पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यातच अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. धरणाच्या परिसरात होणाऱ्या या पर्यटकांच्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे श्रीरामपूरचे उपविभागीय दंडाधिकारी अनिल पवार यांनी धरणाच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
निवडणूक आली की आठवतो शिक्षक, कोरोना झाला की आठवतो शिक्षक…तुम्हीच सांगा साहेब आम्ही कोणते काम करायचे?
मुळा धरण परिसरात प्रशासनाने कलम १४४ लागू केल्यामुळे संचार करणे, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, पाच किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे यासाठी बंदी असणार आहे. या आदेशामधून मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच या विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना सूट देण्यात आली आहे.


