खेड : राज्यात २०१९ विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भिन्न विचारसरणी असलेले काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील धुसफूस अनेकदा समोर आली आहे. फोडाफोडीच्या राजकारणावरून याआधी शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
असाच एकप्रकारे खेड (राजगुरूनगर) येथे घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांनी पैशाच्या आणि दहशतीच्या जोरावर पंचायत समितीचे सदस्य आपल्या बाजूने करून घेतले होते, असा आरोप करत स्थानिक शिवसेना नेते हे तीव्र नाराज होते. आता हे प्रकरण वाढलं असून खुद्द शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.
त्यांच्या आदेशानुसार आज शिवसेना खासदार व नेते संजय राऊत हे खेडच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शिवसैनिकांची बाजू समजावून घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला गंभीर इशारा दिला आहे. ‘मित्र पक्षामधील नेत्यांची/कार्यकर्त्यांची फोडाफोडी करू नये असा महाविकास आघाडीतील अलिखित नियम आहे. युतीमध्ये देखील या नियमच पालन केलं गेलं होतं. मात्र, आता पुढल्यावेळी महाविकास आघाडी असेल किंवा नसेल या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा उमेदवार असेल. विद्यमान आमदारांना पडून आमचा आमदार येईल याची तयारी आम्ही करू,’ अशी घोषणाच संजय राऊत यांनी केली आहे.
‘माझं हे मत शिवसेना पक्षप्रमुख यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सूचनांनुसारच मी इथे बोलत आहे. जर अजित पवार यांचं इथे ऐकलं जात नसेल तर शिवसेनेला त्यांनी परवानगी द्यावी. शिवसेनेनं हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. शिवसेना कोणत्याही प्रकारची लाचारी पत्करून सत्तेत सहभागी होत नाही. हा इशारा शिवसेनेच्या वाघाच्या शेपटावर पाय ठेवलाय त्यांना आहे. हे असंच होत राहिलं तर आता खेडमध्ये ठिणगी पडली आहे. आमच्या नादाला लागू नका!’ असा रोखठोक इशारा संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे.
नेमका वाद काय?
खेड पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता आहे. त्यांचे 8 सदस्य आहेत. तर कॉंग्रेस, भाजप असा प्रत्येकी एक मिळून 14 पैकी 10 सदस्यांचे बलाबल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य आहेत. सभापतीपद सर्वसाधारण वर्गासाठी आहे. परंतु त्यातच सदस्यांनी सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात बंड केले आहे. तर, ६ सदस्यांना धमकावून आणि पैशाची मस्ती दाखवून राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनी आपल्या बाजूने केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कर्जाच्या हप्त्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; पतधोरण जाहीर
- ‘कोरोना लस घ्या आणि मोफत बिअरचा आस्वाद घ्या’
- बँकांनी शेतकऱ्यांना पिककर्ज वेळेत उपलब्ध करून द्यावे – उद्धव ठाकरे
- सर्वोच्च न्यायालयाचा कणा असाच ताठ राहो – सामना
- लाॅकडाऊनमध्ये सवलत मिळताच पैठणमध्ये सर्वत्र गर्दीच गर्दी !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
