मुंबई: बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याने रविवारी राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.
शिवाजी महाराजांना फक्त निवडणुकीपुरते वापरून घेतले व सोडून दिले असेच लोकांना वाटते. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे हिंदू मने चाळविण्यासाठी मोदी यांनी शिवरायांच्या नावाने भावनिक साद घातली. हे आता नेहमीचेच झाले आहे. बंगळुरूत शिवरायांचा अपमान झाला, त्याचे पडसाद महाराष्ट्रासह देशभरात उमटणे स्वाभाविक आहे, पण महाराष्ट्रातील भाजपा पुढारी या विषयावर उसळून उठायचे सोडाच, पण सळसळ करायलाही तयार नाहीत. त्यांनी कागदी निषेधाचे बाण चालवले आहेत. ते ठीक, पण एरवी महाराष्ट्रात असे काही घडले की, राजभवनावर त्यांचे ‘जथेच्या जथे’ पोहोचतात व सरकार बरखास्तीची मागणी करतात. कर्नाटकातील घटनेनंतर हे का होऊ नये? असा खोचक सवालही संजय राऊत यांनी केला आहे.
आज हिंदू आणि हिंदुत्ववादावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. भूतकाळातील वैर जिवंत ठेवून वर्तमानकाळात भूतकाळाचा सूड म्हणून अत्याचारी, खुनी राजवट चालविणारे शिवाजीराजे नव्हते. धर्मपिसाटपणावर त्यांचा विश्वास नव्हता. मात्र धर्मावर, संस्कृतीवर अत्याचाराचे, आक्रमणाचे युग संपले. यापुढे आक्रमण सहन केले जाणार नाही, मोडून काढले जाईल याची जाहीर ग्वाही देणारे शिवाजीराजे होते. मुसलमानांविषयी शिवाजी महाराजांच्या मनात राग नव्हता. त्यांच्या राज्यात मशिदी व दर्गे सुरक्षित होते. त्यांनी मुसलमानांच्या कत्तली केल्या नाहीत. कोणाला सक्तीने हिंदू करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या सैन्यात व आरमारातही मुसलमान होते. त्यांच्या राज्यात मशिदींची जुनी इनामे चालू होती. खास बाब म्हणून नवी इनामे दिली जात होती. यालाच ‘शिवशाही’ असे संबोधले जाते. असेही सामनातून म्हटले आहे.
राष्ट्रीय पातळीवर त्या शिवशाहीचा लोप झालेला दिसत आहे. शिवाजी महाराज परधर्मसहिष्णू होते. मग कर्नाटकसारख्या हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात शिवरायांचा अपमान, विटंबना होण्याचे कारण काय? पंतप्रधानांनी काशीस मांडलेला विचार चार दिवसांनीही बंगळुरूत पोहोचला नाही. काशीत शिवरायांचा सन्मान आणि बंगळुरूत अपमान हे चालणार नाही, हे ढोंग आहे. भाजपावाल्यांनो, बंगळुरूचे राजभवन गाठा, बोम्मईंचे सरकार आता घालवाच. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवरायांचा अपमान ही किरकोळ किंवा छोटी घटना असेल तर मोठे काय? शिवसेनेचा सवाल
- “दारू प्या, मटण खा पण बटण मात्र शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे दाबा”, खा. संजय जाधव यांचे मतदारांना आवाहन!
- “गुलाबरावांवर गुन्हा दाखल करा; अन्यथा गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही”
- ”गेंड्याच्या कातडीचं हे सरकार आहे, यांच्यात संवेदना उरलेल्या नाहीत”
- द्रविड गुरुजींनी घेतली कर्णधार विराट कोहलीची शाळा : पहा व्हिडीओ


