मुंबई : रिपब्लिकन वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील संवाद उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. यानंतरही केंद्रातील भाजप सरकार गप्प का असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. केंद्रात जर आज काँग्रेसचं किंवा अन्य पक्षाचं सरकार असतं आणि भाजपा विरोधात असते त्यांनी यावरून तांडव केलं असतं असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं.
‘अर्णब गोस्वामी यांच्यासारखी माहिती आपल्या लष्करातल्या जवानानं केली असती तर त्याचं कोर्ट मार्शल केलं असतं. त्याला देशद्रोही ठरवण्यात आलं असतं. त्याला देशाच्या सुरक्षेसाठी धोकाही मानलं असंत. आज केंद्रात काँग्रेस किंवा अन्य कोणत्या पक्षाचं सरकार असतं आणि भाजप विरोधी पक्ष असता तर त्यांनी याविषयावरून तांडव केलं असतं. परंतु आता भाजप गप्प का?, असा सवाल राऊत यांनी केला. तसंच देशाच्या सुरक्षेविषयी, किंवा सुरक्षेला धोका निर्माण होणारी माहिती लीक होती तरी कारवाई का होत नाही? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
दरम्यान, याच मुद्द्यावरून गोस्वामी यांच्याविरोधात कॉंग्रेस देखील चांगलीच आक्रमक झाली आहे. पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. ही कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी म्हणजे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी याची माहिती अर्नब गोस्वामीला कशी मिळाली? त्याने अजून कोणाला ही माहिती दिली का? तसेच त्याने स्वतः सांगितले आहे की ज्याने त्याला ही माहिती दिली तो मोदी सरकारमधील मोठा व्यक्ती आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
अर्नब गोस्वामी यांचे कृत्य हे Official Secrets Act, 1923, Sec. 5 नुसार कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे तर आहेच पण हा देशद्रोहाचा प्रकार आहे. त्यामुळे गोस्वामीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षातर्फे शुक्रवार दि. २२ जानेवरी रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती थोरात यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीची तज्ज्ञ पथकामार्फत तपासणी केल्यानंतरच आगीचे कारण स्पष्ट होईल – अजित पवार
- आज पुन्हा इंधन दरवाढ ! मुंबईत पेट्रोलने गाठला उच्चांक
- गडाखांचा धडाका : राज्यातील जलसंधारण कामांच्या विशेष दुरुस्तीसाठी तब्बल १६८ कोटींची मंजुरी
- रहाणेनं मैदानाबाहेरही जिंकली मनं; कांगारूची प्रतिकृती असलेला केक कापण्यास दिला नकार
- प्रजासत्ताक दिनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, राजशिष्टाचार विभागाचे आदेश


