टीम महाराष्ट्र देशा : दुष्काळमुक्त, बेरोजगारीमुक्त, प्रदूषणमुक्त असा नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी खंबीर साथ द्या, आशीर्वाद द्या, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. नाशिक, त्र्यंबकेश्वर, सिन्नर येथे त्यांच्या दणदणीत सभांना प्रचंड गर्दी उसळली होती. आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत झाले. आगामी निवडणुकीत राज्यात पुन्हा भगवाच फडकणार, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी आदित्य ठाकरे यांच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी तोंडभरून कौतुक केल आहे.
आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आबालवृद्धांकडून स्वागत होत आहे, आशीर्वाद मिळत आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात जात आहेत. बेरोजगार तरुण, शेतकरी, कामगार, महिलावर्ग अशा सर्वच घटकांची आदित्य ठाकरे यांच्याकडून अपेक्षा आहे. त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, असे सर्वांनाच वाटत आहे. हे चित्र महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडविणारे आहे. शिवसेनेची नवी दिशा नवी वाट सुरू आहे, असे आपल्या भाषणात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.


