मुंबई – स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडले गेले. मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही जागा आहे. त्यामुळे तेथे संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, शिवभक्तांच्या भावना लक्षात घेण्याची विनंती केली आहे.
यासंदर्भात त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी माहिती दिली आहे. संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची दुरावस्था दूर करुन तेथे राज्यातील सर्वोत्तम स्मारक तयार करण्याची विनंती संभाजीराजेंनी केली आहे.

आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये भोसले म्हणतात,मायभूमीसाठी, स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडले गेले. मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही जागा आहे. संगमेश्वरचा परिसर नेहमी संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण देणारा आहे. आज या परिसराची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. सर्वोच्च त्यागाचे प्रतिक असलेल्या या जागेवर छत्रपती संभाजी महाराजांचे अर्धवट असलेले स्मारक पूर्ण व्हावे यासाठी सर्व शिवभक्तांच्या वतीने मा. मुख्यमंत्री यांना पत्र लिहले आहे. मा.मुख्यमंत्री शिवभक्तांच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर निर्णय घेतील हि अपेक्षा.


