टीम महाराष्ट्र देशा: आघाडी सरकारच्या काळामध्ये तब्बल १७ विभागांचा कारभार पाहिलेले राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम केला आहे. पाटील यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. पक्ष अडचणीत असताना सोडून जाणाऱ्या राणा जगजितसिंहां विरोधात मैदानात उतरण्याची घोषणा राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत धोरण आणि तोरण लोकचं ठरवतील, असा एल्गार सलगर यांनी केला आहे.
सुरुवातीपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहिलेले डॉ पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र राणा जगजितसिंह यांनी पक्षाला रामराम केल्याने उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पक्षाला फटका बसला आहे. जेष्ठ नेत्यांनी पक्षाची साथ सोडली असली तरी युवकांनी आता राष्ट्रवादीला उभारी देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.
शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत युवकांना संधी देणार असल्याचं घोषित केले होते, त्यामुळे मी उस्मानाबाद – कळंब मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी राज्यभरात फिरलेले आहे, लोकांनी माझ काम पाहिलेलं आहे. साहेबांनी उमेदवारी दिल्यास राणा जगजितसिंह यांच्या विरोधात लढणार असल्याचं सक्षणा सलगर यांनी सांगितले आहे.
एवढे वर्ष मंत्री राहिलेले राणा जगजितसिंह पाटील मतदारसंघाचा विकास करण्यासाठी भाजपमध्ये गेल्याचं सांगतात. ते साफ खोट बोलत आहेत. पवार साहेब माझ्या ह्र्दयात आहेत असं सांगतात. परंतु अमित शहा स्टेजवरून शरद पवारांचा पाणउतारा करत असताना राणा जगजितसिंह शांत बसतात. प्रेम आहे म्हणणारा माणूस असा प्रेमभंग करत नाही, असा घणाघात सलगर यांनी केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
