🕒 1 min read
मुंबई : संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने गावातील गरीब व रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबाला दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गरजू लोकांसाठी अनेक मदतीचे हात देखील पुढे येत आहे. कोरोनाच्या लढ्यासाठी देशातील अनेक दिग्गज मंडळींकडून याचप्रमाणे उद्योजकांकडून मदतीचे हात येत आहे.
तसेच अभिनेता आणि उद्योजक सचिन जोशीने आपले 36 रुमचे हॉटेल क्वारंटाईनसाठी मुंबई महापालिकेला दिले आहे. ‘मुंबईत माणसांची खूप गर्दी असते. येथे पर्यायी रुग्णालय आणि बेड नाहीत. जेव्हा पालिकेने आमच्याकडे मदतीचा हात मागितला. तेव्हा आम्ही पालिकेला मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आम्ही आमचे हॉटेल क्वारंटाईन सुविधेसाठी पालिकेला दिले,’ असं सचिन जोशीने सांगितले.
सचिन जोशी यांची पत्नी उर्वशी शर्माने सांगितले की, ‘आम्हाला आनंद होत आहे की, आम्ही आमचे हॉटेल क्वारंटाईनसाठी पालिकेला दिले. हा माझ्या पतीचा निर्णय आहे आणि त्यांच्या निर्णयाला माझा पाठिंबा आहे. याशिवाय आम्ही गरजूंना जेवणही देत आहोत.’ असं वृत्त tv9 मराठी ने प्रसिद्ध केलं आहे.
दरम्यान, चितळे उद्योग समूहाने करोना संसर्गाच्या संकटात समाजासाठी मदतीचा हात दिला आहे. या उद्योग समूहातील ‘बी. जी. चितळे’ यांच्याकडून मुख्यमंत्री मदतनिधीसाठी एक कोटी तर पुण्यातील ‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांच्याकडून पंतप्रधान मदतनिधीसाठी पन्नास लाख रुपये दिले आहेत.

