ल्वीव्ह: रशिया युक्रेन युद्धाचा आज १५वा दिवस आहे. आजही रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. काही भागात युद्धविराम घोषित केला असला तरीही बऱ्याच ठिकाणी रशिया बॉम्ब हल्ले, रॉकेट हल्ले करतच आहे. अशातच आता रशियाने एका प्रसूती रुग्णालयावर (मॅटर्निटी हॉस्पीटल) हल्ला केला. नागरी वस्ती असणाऱ्या ठिकाणांवर हल्ला करणार नाही, असे वचन देणाऱ्या रशियाने युक्रेनमध्ये नवजात बालकांनाही सोडले नाही.
युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या हल्ल्यात दक्षिण पूर्व भागातील मारियुपोल शहरातील एका मॅटर्निटी हॉस्पीटलवरही रशियाकडून बॉम्बवर्षाव करण्यात आला. इथे अनेक नवजात बालके आणि त्यांच्या माता उपचार घेत होत्या. या बॉम्बवर्षावात एक मॅटर्निटी हॉस्पीटल पूर्ण उद्ध्वस्त झाल आहे. या हल्ल्यात १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर अनेक महिला आणि लहान मुले मलब्याखाली अद्यापही अडकलेले आहेत. या हल्ल्यातील जखमींची आणि मृतांची माहिती मिळवण्याचे काम सुरू अजूनही सुरूच आहे.
या हल्ल्यानंतर मृतांच्या संख्येत वाढ होणार आहे. बुधवारी रशियाने रुग्णालयालावर निशाणा साधल्यानंतर नगर परिषदेच्या सोशल मीडिया हॅन्डलवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात रुग्णालयाचं मोठं नुकसान झाल्याचं सांगितले आहे. युक्रेनला या युद्धामुळे मोठ्या विध्वंसाचा सामना करावा लागत आहे. याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनीही या हल्ल्याचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटर हॅन्डलवरून शेअर केला आहे. हा हल्ला म्हणजे ‘अत्याचार’ असल्याची तीव्र भावना झेलेन्स्की यांनी व्यक्त केली आहे. रशियाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी केलेल्या घोषणेनुसार, हजारो नागरिकांना सुरक्षितपणे कीव्हच्या आसपासच्या शहरांमधून तसेच दक्षिणेकडील मारियुपोल, एनरहोदर आणि वोलनोवाखा, पूर्वेकडील इझुम आणि ईशान्येकडील सुमी या शहरांमधून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी युद्धविराम जाहीर करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या:


