🕒 1 min read
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नच्या पार्थिवावर ३० मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट मैदान (एमसीजी) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अशी माहिती व्हिक्टोरिया राज्यातील शासनाचे प्रवक्ते डॅनिएल अँड्रय़ू यांनी बुधवारी दिली.
शुक्रवार, ४ मार्च रोजी थायलंडमधील कोह सामुई येथे ५२ वर्षीय वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्नचे पार्थिव सध्या बँकॉक येथे असून पुढील काही दिवसांत ते ऑस्ट्रेलियात दाखल होईल. वॉर्नवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून या वेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मेलबर्नला होणाऱ्या अंत्यसंस्कारापूर्वी वॉर्नचे कुटुंबीय त्याला आदरांजली वाहणार आहे. मेलबर्नमध्येच जन्मलेल्या वॉर्नने १९९४ मध्ये येथे हॅट्ट्रिक घेतली होती. त्याशिवाय कसोटी कारकीर्दीतील ७०० बळींचा टप्पाही त्याने २००६ मध्ये याच मैदानावर गाठला आहे. एमसीजीबाहेरच वॉर्नचा पुतळा उभारण्यात आला असून लवकरच एका स्टँडलाही त्याचे नाव देण्यात येणार आहे.
वॉर्नला निरोप देण्यासाठी एमसीजीवर लाखोंचा जनसागर उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे करोनाच्या काळात त्याचे व्यवस्थापन करता यावे, यासाठी व्हिक्टोरिया शासन सामान्य नागरिकांसाठी तिकिटे ठेवणार आहे. ही तिकिटे मोफत देण्यात येतील अथवा त्यांचे मूल्य आकारले जाणार का? याविषयी लवकरच व्हिक्टोरिया शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती देण्यात येणार आहे. त्याशिवाय ऑस्ट्रेलियातील वृत्तवाहिन्यांवर वॉर्नच्या अंत्यविधीचे थेट प्रक्षेपण करण्यासाठीही येथील शासन प्रयत्नशील आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
