टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना २००८ मधील परप्रांतियांविरोधात इगतपुरीमधील आंदोलन आणि हॉटेल तोडफोडप्रकरणी क्लीन चीट मिळाली आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात कोणताही पुरावा न मिळाल्याने इगतपुरी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
२००८ साली रेल्वेमध्ये परप्रांतीय उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्याच्या कारणावरुन मनसेने राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन केलं होतं. या प्रकरणात राज ठाकरे यांना मुंबईत अटकही झाली होती. राज यांच्या अटकेच्या निषेधार्थ इगतपुरी येथील मुंबई आग्रा-महामार्गावर असलेल्या एका परप्रांतीय हॉटेलवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. या प्रकरणी इगतपुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
इगतपुरी न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु होती. १८ डिसेंबर २०१८ रोजी राज ठाकरे इगतपुरी न्यायालयात उपस्थित राहिले होते. त्यावेळी राज ठाकरेंना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. परंतु या प्रकरणात कुठलाही पुरावा न मिळाल्याने राज यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

