टीम महाराष्ट्र देशा- राज्यातल्या बहुतांश भागात कालही चांगला पाऊस झाला. विशेषतः कोकण, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. मुंबईत झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झालं. शहराच्या विविध भागात पाणी साचल्यामुळे हार्बर रेल्वेसेवा बंद झाली होती. मुंबई- पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या, नागपूरहून मुंबईकडे येणारी दुरांतो एक्सप्रेस इगतपुरीमध्ये थांबवण्यात आली. त्याचबरोबर मुंबईहून सुटणाऱ्या काही रेल्वेगाड्याही रद्द कराव्या लागल्या, यामध्ये नंदीग्राम आणि देवगिरी एक्सप्रेस या रेल्वेगाड्यांचाही समावेश आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्याही नाशिक, इगतपुरी आणि मनमाड आदी स्टेशनवर थांबवून ठेवण्यात आल्या, काही रेल्वे गाड्या या स्थानकावरून मागे फिरवण्यात आल्या. दरम्यान, मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरातली अतिवृष्टी लक्षात घेता आणखी सहा तुकड्या पाठविण्याची विनंती राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडे करण्यात आली असून, शासन लष्कर, नौदल आणि अन्य यंत्रणांच्याही संपर्कात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणातून सोडण्यात येणारं पाणी काल रात्री अकरा वाजता कमी करण्यात आलं, त्यामुळे नाशिक शहरातली पुराची तीव्रता काही प्रमाणात कमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.दरम्यान, नाशिक जिल्ह्यात आलेल्या पुरांमुळे आणि विविध धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे, या पाण्यामुळे पैठणच्या जायकवाडी प्रकल्पात पाण्याची मोठी आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीतही मोठी वाढ होत आहे.
कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही काल मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. यामुळे अनेक ठिकाणी घर, गोठे पडल्याच्या घटना घडल्या.रायगड जिल्ह्यात पूर आणि समुद्राच्या भरतीमुळे पेण तालुक्यातल्या वाशी, कणे आणि मोजे गावात पाणी घुसल्यामुळे अनेक नागरिक अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, तट रक्षक दलाच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं.
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सुमारे ३५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. नद्यांना आलेल्या महापुराचा फटका ऊस, भातासह सर्व खरीप हंगामी पिकांना बसला आहे.सातारा जिल्ह्यातल्या कोयना, कान्हेर, धोम धरणातून नदी पात्रात पाणी सोडण्यात आलं आहे. यामुळे कृष्णा, कोयना, आणि वेन्ना नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
पांझरा नदीला पूर आल्यानं धुळे शहरातले दोन पूल पाण्याखाली गेले आहेत, या पूलावरची वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे, त्याचबरोबर आजूबाजूच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. जालना शहरात काल हलका पाऊस झाला. भोकरदन तालुक्यातले धामणा आणि जुई धरण वगळता जिल्ह्यातले ४१ लघुप्रकल्प अद्याप कोरडेच आहेत. विहिरींची पाणीपातळीही वाढलेली नाही. त्यामुळे खरीपाच्या पिकांसाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, या अतिवृष्टीमुळं आणि आजही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्यातल्या ठाणे, नवी मुंबई, रायगड, पुणे, पालघर, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्ह्यातले माण आणि खटाव तालुके वगळता जिल्ह्यातल्या सर्व शाळांना तसंच सांगली जिल्ह्यातल्या शिराळा, वाळवा, मिरज, आणि पलूस तालुक्यातल्या शाळांना सुटी देण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातल्या शाळांनाही सुटी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं आपल्या कार्य क्षेत्रातल्या सर्व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.
जयदत्त क्षीरसागरांवर महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी : आदित्य ठाकरे
राष्ट्रवादीतले अनेक नेते दुपारी शपथ घेतात आणि रात्री मला फोन करतात – महाजन
प्रत्येकाचा आधार बनून काम करण्याचा आपला प्रयत्न – पंकजा मुंडे
बिहार: पूरग्रस्तांच्या सहाय्यतेसाठी ‘एनडीआरएफ’ ची मदत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

