टीम महाराष्ट्र देशा : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षात असलेल्या भाजप-शिवसेनेने 72 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा झाला असल्याची बोंब मारली होती. या घोटाळ्यावरुन भाजपने सत्ताधाऱ्यांवर आणि प्रामुख्याने अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती. जर या लोकांनी घोटाळा केला होता, तर सत्तेत आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने अजित पवार आणि सुनील तटकरेंवर कारवाई का केली नाही ? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना विचारला आहे. नाशिकमध्ये मनसेची सभा आयोजित करण्यात आली होती, या सभेत राज ठाकरे बोलत होते.
दरम्यान, महाराष्ट्रातल्या 28 ते 29 हजार गावांमध्ये दुष्काळ आहे. या गावांमधले लोक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. मग राज्यातील दुष्काळ निवारणासाठी सिंचन प्रकल्पांवर खर्च केलेला पैसा गेला कुठे? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी विचारला आहे. आता यावर भाजप शिवसेनेकडून काय पर्तीहल्ला होतोय याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे.


