🕒 1 min read
नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भाषण आणि क्वाड गटाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल अमेरिकेत दाखल झाले. वॉशिंग्टन इथल्या विमानतळावर भारतीय समुदायानं त्यांचं जोरदार स्वागत केलं. आज ते अध्यक्ष जो बायडन यांची भेट घेणार असून द्विपक्षीय चर्चा करणार आहेत; तसंच क्वाड गटाच्या बैठकीतही सहभागी होणार आहेत. तर उद्या ते संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार आहेत.
अमेरिका दौऱ्याच्या कालच्या पहिल्याच दिवशी मोदी यांनी महत्वाच्या भेटीगाठींचा धडाका लावला. अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरीस यांच्याबरोबरच, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन आणि जपानचे पंतप्रधान योशिहीदे सुगा यांची स्वतंत्रपणे भेट घेत मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली. तसंच, भारताच्या दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या पाच क्षेत्रांमधल्या आघाडीच्या कंपन्यांच्या प्रमुखांशीही त्यांनी चर्चा केली.
कमला हॅरीस यांच्याशी बोलताना मोदी यांनी, अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी त्यांची झालेली निवड ऐतिहासिक असल्याचं सांगत त्यांचं अभिनंदन केलं. एकमेकांच्या या पहिल्याच भेटीबद्दल दोघांनी आनंद व्यक्त केला. कोरोना संकटाशी भारत लढत असताना हॅरीस या भारताच्या पाठीमागे ठामपणानं उभं राहिल्याची आठवण सांगताना मोदी यांनी अमेरिका सरकार, इथल्या कंपन्या आणि भारतीय समुदायाचे आभार मानले. मोदी आणि हॅरीस यांनी जगभरातल्या कोरोना परिस्थितीवर चर्चा केली. हॅरीस यांनी भारताच्या लसीकरण मोहिमेचं आणि इतर देशांना लस पुरवण्याच्या धोरणाचं कौतुक केलं. आजच्या या चर्चेत अफगाणिस्तान आणि हिंद-प्रशांत क्षेत्रातलं खुलं आणि सर्वसमावेशक वातावरण या मुद्द्यांवर प्रामुख्यानं चर्चा झाली.
तसंच, पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी सहकार्य अधिक दृढ करण्याची गरज असल्याचंही दोघांनी मान्य केलं. पर्यावरणाच्या मुद्द्यावरही एकत्रित काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. अवकाश, माहिती आणि तंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्रातल्या सहकार्याबाबतही चर्चा केली. मोदी यांनी हॅरीस यांना भारत भेटीचं निमंत्रणही दिलं.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात घटना घडल्यावर अन्य राज्यांकडे बोट दाखविणे, ही असंवेदनशीलता : देवेंद्र फडणवीस
- महिलांवर अत्याचार व्हावेत हे कोणत्या सरकारला वाटतं?- संजय राऊत
- कोयना धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
- ‘काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा आणि निष्ठा असणारे नेतृत्व गमावले’
- डोंबिवलीमधील सामूहिक बलात्काराचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा; भाजपा महिला मोर्चाची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
