मुंबई: गाझियाबादमधील एका मंदिरात पाणी पिण्यासाठी मुस्लिम मुलाला मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हा व्हिडिओ आरोपीने स्वत: इन्स्टाग्रामवर मुलाला मारहाण करून सामायिक केला होता. याप्रकरणी कडक कारवाई करत गाझियाबाद पुलिस यांनी आरोपीला अटक केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून आरोपी हिंदू एकता संघ नावाच्या संस्थेचा सदस्य असल्याचे सांगितले जात आहे.
गाझियाबाद पोलिसांनी ट्वीट केले आहे की, व्हिडिओवर दखल घेतल्यानंतर कडक कारवाई करून ताबडतोब आरोपीला अटक करण्यात आली आहे. श्रंगी नंदन यादव असे आरोपीचे नाव असून तो बिहारच्या भागलपूर येथील रहिवासी आहे. हा तरुण हिंदू एकता संघ नावाच्या संस्थेशीही संबंधित असल्याचा आरोप आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण झालेल्या मुलाचा शोधही घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून लोक आरोपीच्या या कृत्याचा निषेध करत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये आरोपी नंदन यादव प्रथम मुलाचे नाव विचारतो. तो मुलगा आपले नाव आसिफला सांगते तर आरोपी मंदिरात काय करायला गेला ते विचारतो. मुलाला उत्तर दिले की मी पाणी प्यायलो होतो. यानंतर आरोपीने मुलाला मारहाण करण्यास सुरवात केली. यावरून आजच्या सामनाच्या रोखठोक या सदरा मध्ये
एका बाजूला पंतप्रधान मोदी पाकिस्तानला कोविड लस पुरवून माणुसकी दाखवतात. त्याकामी टीका सहन करतात. त्याच वेळी उत्तर प्रदेशातील एका मंदिरात तहानलेल्या मुसलमान मुलास पाणी नाकारले जाते, हे कसले रामराज्य? जेथे पाणी नाकारले त्या मंदिरात देवांचे वास्तव्य नसावे! असा सवाल करत मोदींवर टीका करण्यात आली आहे.
जात आणि धर्माचे भूत आपल्या देशातून जाईल असे दिसत नाही. जात आणि धर्म आरक्षण, राखीव जागांच्या पलीकडे जाऊन पोहोचला आहे. आपला हिंदुस्थान देश महान असल्याचे भाषणात नेहमीच सांगितले जाते. पण त्या महानपणास जातीयतेचा डाग लावून काही लोक देशाला खुजे करीत असतात. अशाच एका प्रकरणाने देशाच्या महानतेवर प्रश्नचिन्ह लागले. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे जे घडले ते धक्कादायक आहे. येथील एका मंदिरात तहानलेला एक लहान मुलगा पाणी पिण्यास गेला. नळाच्या तोटीतून तो दोन घोट पाणी प्यायला, तोच मंदिरातील एक-दोन लोक धावत तेथे आले. त्या मुलास त्यांनी निर्घृणपणे मारले. त्या मुलास मारत असतानाचा एक व्हिडीओ तयार करून ‘व्हायरल’ केला.
त्या तहानलेल्या लहान मुलास का मारले? तर तो धर्माने मुसलमान होता. त्याचा गुन्हा असा की, तो मुसलमान असूनही तहान भागविण्यासाठी हिंदूंच्या मंदिरात गेला. मंदिराबाहेर एक बोर्ड आधीच लागला होता. मुस्लिमांना आतमध्ये प्रवेश नाही! बस्स. हा जणू देवाचाच आदेश होता की, तहानेने तडफडणाऱया मुलांनाही मंदिरात दोन घोट पाण्यासाठी प्रवेश द्यायचा नाही. भुकेलेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी हाच खरा धर्म असल्याचे नेहमीच सांगितले गेले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला चवदार तळय़ाचा सत्याग्रह केला. दलितांना पाणवठय़ावर येण्यास बंदी होती. त्या विरोधात हे बंड होते. पाण्यास जातही असते हे डॉ. आंबेडकरांनी तेव्हा सांगितले. आता पाण्यास धर्मही असल्याचे त्या मुसलमान मुलाने दाखवून दिले.
प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी या ‘जय श्रीराम’चा नारा देत नाहीत, त्या हिंदूविरोधी आहेत, असा प्रचार सुरू आहे. पण हिंदूंच्या मंदिरात तहानलेल्यास पाणी नाकारणे व पाणी प्यायल्याबद्दल एका मुलास मारणे हेसुद्धा तितकेच हिंदूविरोधी आहे. पंतप्रधान मोदी हे त्यांच्या ‘मन की बात’मधून देशातील अनेक लहानसहान घटनांना भावनिक फोडणी देत असतात. त्यांनी पाणी नाकारल्या गेलेल्या त्या लहान मुलाच्या विषयासही स्पर्श करावा. असा सल्ला यावेळी सामानातून देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- अन् रस्ता ओलांडताना सापडले गलगले; भरत जाधवने केला अनुभव शेअर
- इंग्रजांना पुन्हा धूळ चारली, रोहित-भुवनेश्वरच्या धमाक्यापुढे साहेबांनी गुडघे टेकले !
- परमबीर सिंह यांनी आरोप सिद्ध करावेत, मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार – अनिल देशमुख
- हे तर अधिकाऱ्यांना दबावात आणून भाजपने केलेलं षडयंत्र : सचिन सावंत
- १०० कोटी वसुली प्रकरणात उद्धव ठाकरेंचासुद्धा सहभाग : नारायण राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

