मुंबई : स्त्री संग समतिथीला केला तर मुलगा आणि विषमतिथीला केला तर मुलगी होते असे वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर गर्भलिंग निदानाची जाहिरात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरु असतानाच माध्यमांमध्ये सुरु असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे महाराज व्यथित झाल्याचे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना सल्ला दिला आहे. मुंबई येथे पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘इंदोरीकर महाराजांची भाषणं जनप्रबोधनासाठी असतात, एका वाक्यानं माणसाची तपश्चर्या घालवू नका,’ असा सल्ला पाटलांनी माध्यमांना दिला.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, ‘इंदोरीकरांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण इंदोरीकरांच्या पाठीशी आहे,’ असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले. तसेच ‘मी इंदोरीकर महाराजांचं समर्थन करत नाही. त्यांनी महिलांबद्दल ते विधान करायला नको होतं. दिवसरात्र किर्तनं करून तो माणूस समाज प्रबोधनाचं काम करतोय, ‘त्या’ एका वक्तव्यावर त्या माणसाची सारी तपश्चर्या घालवू नका,’ असे पाटील म्हणाले.
दरम्यान, ’25 फेब्रुवारीला भाजप 400 ठिकाणी आंदोलन करणार, तहसील कार्यालयांसमोर शेतकरी, महिला समस्यांबाबत आंदोलन करणार,’ अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना दिली. आम्ही पाडणार नाही पण हे सरकार पडणार, असा गाढा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.


