अमरावती : महाराष्ट्र नवनीर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा समोर आणल्यानंतर राज्यात धार्मिक वातावरण चांगलेच पेटले आहे. राजकारणात देखील याचे मोठे पडसाद दिसत आहेत. भोंग्याचा मुद्दा राजकीय हत्यार बनवण्याचे प्रयत्न राज्यात होत आहेत. दरम्यान, यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“ज्याचा त्याचा धर्म त्याला प्रिय असला पाहिजे पण धर्मावरून वाद निर्माण होईल, अशी धार्मिकता असेल तर ती देशाला घातक ठरेल”, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
एकच डोक्यात असलं पाहिजे तो म्हणजे तिरंगा
बच्चू कडू यांनी अप्रत्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, “झेंडा लावला तर मत मिळत असेल तर काम करण्याची गरज नाही, झेंडा व भाषेच राजकारण करायचं व सत्ता मिळवायची लोकांनी हा भामटेपणा हाणून पाडला पाहिजे, तर एकच डोक्यात असलं पाहिजे तो म्हणजे तिरंगा.”
भोंग्याबाबत राज ठाकरेंचा इशारा
राज ठाकरे यांची काल (१ मे ) औरंगाबद येथे सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत मशिदींवरील भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालिसा वाजवण्याचा इशारा दिला. ३ तारखेला रमजान ईद आहे. मला सणात विष कालवायचे नाही. पण ४ तारखेनंतर ऐकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मशिदींवरील भोंग्यांचा विषय हा नवीन नाही. यापूर्वीही अनेकांनी तो मांडला आहे. मी फक्त त्याला पर्याय सुचवला आहे. ज्या मशिदींवर लाऊडस्पीकर लावले जातील, त्यांच्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा. भोंग्यांचा विषय हा सामाजिक आहे, धार्मिक नाही. त्याला कुणी धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आम्हालाही धर्माचा आधार घेता येतो. असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

