औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या कडक निर्बंध, लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले. आर्थिक परिस्थिती विस्कटली. याचाच परिणाम पालकांच्या रोजगार व उत्पन्नांवर झालेला आहे. त्यामुळे शाळा व महाविद्यालयांकडून आकारले जाणाऱ्या भरमसाठ शैक्षणिक शुल्कात कपात करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी वैजापूरच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
सद्यपरिस्थितीत पालकवर्ग शाळा व महाविद्यालयांना फीस देण्यास सक्षम नाही. कोविडमुळे सर्व शिक्षण ऑनलाइन पद्धतीने देण्यात येत असल्याने अनेक तांत्रिक समस्या देखील निर्माण झालेल्या आहेत. तरी मुख्यमंत्र्यांनी पुढील मागण्यांचा गांभीर्याने विचार करून मागण्यांची पूर्तता करावी. शाळा व सर्व अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांचे भरमसाठ असलेले शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे. ज्या सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतलेला नाही अशा सुविधांचे शुल्क शैक्षणिक शुल्कामध्ये आकारले जाऊ नये.
त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा झालेली नाही परंतु त्यांचे परीक्षा शुल्क हे घेण्यात आलेले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क शासनाने तत्काळ परत करण्यासंदर्भातील सूचना ह्या संबंधित शाळा, महाविद्यालय व विद्यापीठांना देण्यात याव्यात. क्रीडा क्षेत्रात आपले भवितव्य उज्वल करण्याचे प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान या कोविड काळात झालेले आहे. मागील दीड वर्षांपेक्षा अधिक काळापासून कुठल्याही प्रकारच्या क्रीडा स्पर्धा न झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांची क्रीडा प्रकारात सहभागी होण्याची वयोमर्यादा संपलेली आहे.
अशा सर्व विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढवून देण्यात यावी. अशा विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. अभाविपच्या सर्व मागण्यांचा लवकरात लवकर विचार करून मागण्या पूर्ण करण्यात याव्या. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अभाविप तर्फे देण्यात आला. यावेळी अभाविपचे तुषार साळुंके, प्रशांत सोमवंशी, वैभव कासार, चैतन्य बहिरुवाले हे उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात आज कोरोना बाधितांचा आकडा वाढला; मात्र कोरोनामुक्तांचा आकडा अधिकच !
- ‘अल्पसंख्याक समाजाचा विकास आराखडा पंधरा दिवसात सादर करा’, अमित देशमुखांचे निर्देश
- दानवे म्हणाले, ‘संजय राऊत चावी दिल्यावर बोलतात’; आता राऊतांच सडेतोड प्रत्युत्तर !
- काळी, सफेद, पिवळ्या बुरशीनंतर आता ‘या’ राज्यात हिरव्या बुरशीचा रुग्ण
- अजब! ‘या’ विषयात बी. कॉमच्या शेकडो विद्यार्थ्यांना मिळाला चक्क भोपळा

