🕒 1 min read
बीड : विरोधी पक्षाच्या यात्रा बकवास आहेत, सत्ता असताना तुम्हाला जनतेसाठी काही करता आलं नाही, आता कसल्या यात्रा काढता? अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्रानंतर राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र करण्याची वेळ आली आहे, त्यासाठी तयार रहा असेही त्या म्हणाल्या.
आष्टी येथे झालेल्या सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, बीडची माणसं गरीब असली तरी त्यांचे मन मोठं आहे. लोकनेते मुंडे साहेबांवर त्यांनी अतोनात प्रेम केले त्यामुळेच भाजपला भरभरून यश मिळाले आहे, हे कदापि विसरून चालणार नाही. मुंडे साहेबांच्या पश्चात मी रडणार नाही, लढणार अशी शपथ घेतली होती, त्यादृष्टीने मी जनतेच्या भल्यासाठी काम करत आहे, त्यांचे नांव त्यामुळेच आज अजरामर झाले आहे.
तसेच पुढे बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्र कॉंग्रेस मुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्ही पाळला आता राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करण्याचे आम्ही ठरवले आहे, सर्व शक्तीनिशी राष्ट्रवादीला बीड जिल्हयातूनच काय पण महाराष्ट्रातूनही हद्दपार करू. विरोधी पक्षाचे नेते आज वेगवेगळ्या यात्रा काढून जनतेची दिशाभूल करत आहेत, सत्ता असताना तुम्हाला कांही करता आले नाही, आता कोणत्या तोंडाने जनतेसमोर जाऊन आमच्यावर टीका करत आहात. त्यावेळी काही केले असते तर जनतेने तुम्हाला लाथाडले नसते अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रसने शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केलेले आहे. या यात्रेचे नेतृत्व खासदार अमोल कोल्हे हे करत आहेत. तसेच या यात्रेत अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.
- ‘आवाज बनावा म्हणून सनदी सेवा स्वीकारली पण व्यवस्थेने माझाच आवाज दाबला ‘
- दिपाली सय्यद यांनी पुण्यातून विधानसभा लढवण्याची व्यक्त केली इच्छा
- ‘येत आहेत तेवढे भाजपात घ्या, पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा रासपला द्या’
- ‘मुख्यमंत्री पोलिसांचं कडंं घेऊन फिरतात, आपल्या यात्रेत मात्र महाराष्ट्राचा मावळा सामील आहे’

