परळी – बीड जिल्हयात ज्यांनी ज्यांनी जातीपातीचे राजकारण केले, ते आज नेस्तनाबूत झाले आहेत, त्यामुळे अशा राजकारणाला थारा देऊ नका, विकास हिच जात मी मानते, त्यामुळेच कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्हयात आणू शकले, भविष्यात विकासाच्याच मागे उभे रहा असे सांगत राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांनी वंचित घटकांना न्याय देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचे सांगितले.
ऋणनिर्देश सोहळ्यापूर्वी शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मोटरसायकल रॅलीस सुरवात, हजारो युवा कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिल्याबद्दल मतदारसंघातील मराठा समाज बांधवांनी काल पंकजा मुंडे यांचा भव्य ऋणनिर्देश सोहळा आयोजित केला होता, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. लोकसभा निवडणुकीत जिल्हयात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात झाले, ज्यांनी ज्यांनी हे केले त्यांना जनतेने जागा दाखवली, आज ते पाताळात गेले आहेत. भविष्यात जातीचे नाही तर विकासाचे राजकारण मी करणार आहे, जनतेचा विकास हिच जात मी मानते असे त्या म्हणाल्या.


