🕒 1 min read
मुंबई : मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात सुरु करण्यात येत असलेल्या हेरिटेज वॉक उपक्रमाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे मुंबईकरांबरोबरच राज्यातील, देशातील आणि परदेशातील पर्यटकसुद्धा भारतातील अग्रगण्य अशा मुंबई महापालिकेच्या इमारतीचा वारसा पाहण्यासाठी येतील. यातून या वास्तुचा आणि मुंबईचा इतिहास आणि महत्त्व त्यांना कळण्याबरोबरच मुंबईच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका मुख्यालयात या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेबथोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार भाई जगताप, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर – सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्यासह मुंबई महापालिका समिती अध्यक्ष, गटनेते, नगरसेवक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात नुकताच कारागृह पर्यटनाचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. आज महापालिकेच्या हेरीटेज वॉकचा उपक्रम सुरु करण्यात आला. विधानभवनाची माहिती सर्वसामान्य लोकांना व्हावी यासाठी तेथील पर्यटनाचेही नियोजन करण्यात येत आहे. पर्यटनातील या नवनवीन संकल्पनांमुळे राज्याच्या पर्यटनाला नवे आयाम प्राप्त होतील. मुंबई शहराला मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यचळवळीत मुंबई हे महत्त्वाचे केंद्र होते. संयुक्त महाराष्ट्राचा लढाही मुंबईतूनच लढला गेला. अनेक राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक चळवळी इथून सुरु झाल्या. मुंबईने अनेक नेते, अभिनेते, कलावंत, महापुरुष दिले. सर्व प्रकारच्या आपत्तींवर मात करुन पुढे चालत राहणाऱ्या या शहराचे वेगळेपण आहे. आजच्या उपक्रमामुळे देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना मुंबईचे हे वेगळेपण आणि महत्त्व जाणून घेण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर यातून शहरासह राज्याच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
- संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार
- मराठी भाषा समृद्ध व्हावी यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आवश्यक – सुभाष देसाई
- समाज माध्यमावर मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करा – रणजितसिंह डिसले
- समाजकल्याण कर्मचाऱ्यांचे नियोजित लेखणी बंद आंदोलन स्थगित, धनंजय मुंडेंच्या शिष्टाईला यश
- हेरिटेज वॉक प्रमाणेच मुंबईतील किल्ल्यांचा विकास करु – उद्धव ठाकरे


