अमरावती : अमरावती मध्ये दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठी घोषणा केली आहे. अमरावतीत येत्या आठवड्यात लॉकडाऊन असणार आहे. हा लॉकडाऊन सोमवारी संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन सात दिवसांसाठी असणार आहे.
अमरावतीत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावतीत कोरोनाचे दररोज मोठ्या प्रमाणात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. अमरावतीत कोरोनाचा विळखा अतिशय घट्ट झाला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन अमरावतीत लॉकडाऊन घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. यशोमती ठाकूर यांनी स्वत: पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली.
“अमरावतीत सात दिवस सध्यातरी काही करता येणार नाही. काही एमरजन्सी असेल तर तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून काही सोय करता येईल. नाहीतर कोरोना केसेस वाढतील आणि हजारो लोकं रस्त्यावर मरतील. आज लोकांना सगळ्या मुभा देऊन सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी सोयीच्या करुनही लोक ऐकत नाही. लोकं मास्क वापरत नाहीत. पोलीस, डॉक्टर आपलं काम करत आहेत. मग आता करायचं काय? त्यामुळे सात दिवसांचा लॉकडाऊन लागू करत आहोत”, असं यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितलं.
अमरावतीची परिस्थिती पाहाता अमरावती महानगरपालिकाने अमरावती शहरात १२ कंटेन्मेंट झोन घोषित केले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना १४ दिवसापर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंधित क्षेत्र आहे, असे आदेश प्रशासनाने दिला आहे. तर, या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. या १२ प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळल्याने हा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला.
महत्त्वाच्या बातम्या
- चिंताजनक! लस घेतल्यानंतरही उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना कोरोना
- पुन्हा लॉकडाऊन? कोरोना फैलावत असल्याने उद्योग क्षेत्र चिंतातूर
- पैठण तालुक्यातील सर्व आठवडी बाजार पंधरा दिवसांसाठी बंद
- ‘उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भिमाचे…नाही काही कामाचे’
- पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बीड जिल्ह्यातील घटना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

