🕒 1 min read
नागपूर : राज्यात आज आणि उद्या विधीमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाचे कामकाज दोन दिवसाचे असणार आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडून प्रस्तावित विधेयकांची आणि अध्यादेशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या सर्व विधेयक आणि अध्यादेशांवर दोन दिवसीय अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे.
यंदाचं अधिवेशन मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नती आरक्षण, शेतकऱ्यांना मदत, रखडलेल्या नियुक्त्या, कोरोना काळातील भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांमुळे वादळी ठरणार असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली असून ते राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दौरा करत आहेत. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत केले जात असून ते समाजातील बांधवांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधत आहेत.
संभाजीराजे यांनी गेल्या महिन्यात मूक मोर्चाला सुरुवात केली होती. यावेळी लोकप्रतिनिधींनी समाजाच्या प्रश्नांना उत्तर द्यावं असं ते म्हणाले होते. कोल्हापुरातील मूक आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध मंत्र्यांनी त्यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली होती. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत विविध आश्वासने दिल्यानंतर संभाजीराजे यांनी तात्काळ मूक मोर्चाला स्थगिती देत असल्याचे जाहीर केले होते.
दरम्यान, यंदाच्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला नाही तर पुन्हा लोकआंदोलन होईल, असा इशारा संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे. मराठा समाजाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त ते सोमवारी नागपुरात आले होते. या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. सध्या सुरु असलेल्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात हा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली. येत्या काही दिवसात जर राज्य सरकारने या प्रश्नावर नेमकं काय करणार? हे जाहीर केलं नाही तर आम्हाला लोकआंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असाही इशारा संभाजीराजेंनी दिला.
तर, राज्य सरकारने २१ दिवसांचा कालावधी मागितला होता. आम्ही एक महिन्याची मुदत दिली होती. आता ही वेळ संपत आली आहे. तरीही महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर अद्यापही तोडगा काढलेला नाही आणि या प्रश्नावर भूमिका जाहीर केलेली नाही, अशी नाराजी देखील संभाजीराजेंनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार यांना ‘असा’ मुख्यमंत्री कसा चालतो? – नारायण राणे
- आणखी एका निवडणुकीत आता शिवसेना-राष्ट्रवादीची युती, तर काँग्रेस पडली एकाकी !
- ‘अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शिवीगाळ कोणी केली हे जाणून घेण्यासाठी भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा’
- समाजासाठी गट-तट न पाडता एकत्र येत लढा उभारावा, मराठा क्रांती मोर्चाच्या मंथन परिषदेत आवाहन!
- ‘१२ आमदारांचे निलंबन म्हणजे नियोजन पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
