🕒 1 min read
जालनाः ऑनलाइन ऑर्डर दिलेल्या एका शाकाहारी युवतीला चक्क मांसाहारी नुडल्स मिळाले. याप्रकरणी स्विगी कंपनीसह गरीबशहा बाजार परिसरातील चायनीज कॉर्नर हॉटेलचालकाने युवतीला पंधरा हजारांच्या नुकसानभरपाईचे आदेश जालना ग्राहक मंचाने दिले आहेत.
शहरातील एका तरुणीने जून महिन्यात स्विगी कंपनीच्या ऍपच्या माध्यमातून सत्तर रुपये किमतीच्या शाकाहारी सेझवान नुडल्सची मागणी केली होती. मात्र, स्विगी कंपनीच्या वितरक कर्मचाऱ्याने तिला दिलेले नुडल्स शाकाहारीऐवजी मांसाहारी चिकन सेझवान निघाले. या प्रकाराविरोधात युवतीने जालना ग्राहक मंचात तक्रार केली. याप्रकरणी सुनावणीसाठी ग्राहक मंचाने स्विगीसह अन्न देण्यात आलेल्या गरीबशहा बाजार परिसरातील पुना चायनीज कॉर्नर हॉटेलला नोटीस बजावली.
स्विगी कंपनीमार्फत ऍड. डी. बी. नाईक यांनी बाजू मांडली. युक्तिवाद करताना, स्विगी कंपनी ग्राहक आणि खासगी हॉटेल यांच्यामधला दुवा म्हणून काम करते. त्यामुळे कंपनी फक्त ग्राहकांपर्यंत अन्न पोचविण्याचे काम करते. त्यामुळे रेस्टॉरंटने चुकीचे खाद्यपदार्थ पाठविल्यास कंपनीला जबाबदार धरता येणार नाही. त्यामुळे कंपनीचे नाव या प्रकरणातून कमी करण्याची विनंती केली. तर नोटीस बजावूनही हॉटेलचालक सुनावणीसाठी हजर राहिले नाही. त्यामुळे ग्राहक मंचाच्या अध्यक्षा नीलिमा संत, सदस्या नीता कांकरिया व एम. एम. चितलांगे यांनी त्यांच्याविरोधात ता. 27 ऑक्टोबर रोजी एकतर्फी आदेश पारीत केले.
ग्राहक मंचाने तक्रारदार ग्राहक व स्विगी कंपनीच्या वकिलांच्या कथनावरून व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करून ही सेवेतील त्रुटी असल्याचा निष्कर्ष काढला. यामुळे तक्रारदार तरुणीस झालेल्या मानसिक, शारीरिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी नुकसानभरपाई म्हणून कंपनीने पाच हजार वीस रुपये, तर अन्नपदार्थ दिलेल्या हॉटेलचालकाने दहा हजार 50 रुपये तीस दिवसांत देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले. या प्रकरणात तक्रारदार तरुणीने स्वतः आपली बाजू मांडली, तर कंपनीमार्फत ऍड. डी. बी. नाईक यांनी काम पाहिले.
महत्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1202937403746373632?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1202938365709975552?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1202938912605233155?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

