मुंबई : राज्यातील पूरग्रस्त भागात मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी राज्य सरकारनं 11 हजार 500 कोटीं रुपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना नुकताच पावसाचा जोरदार तडाखा बसला होता. अतिवृष्टी आणि पुरामुळे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवित तसंच, वित्तहानी देखील झाली.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी अशी मागणी विरोधकांकडून सातत्यानं केली जात होती. त्यावर मी पॅकेज जाहीर करणारा नाही मदत करणारा मुख्यमंत्री आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरच्या दौऱ्यात लगावला होता. मात्र अखेर मंगळवारी पॅकेजच जाहीर झालं. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वार्ताहरांना त्याबाबतची माहिती दिली.
यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना राज्य सरकारच्या मदतीवर आक्षेप घेतला आहे. ‘कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणासह राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने 11,500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली असली तरी याचे विश्लेषण पाहता केवळ 1500 कोटी रूपयांचीच तातडीची मदत केलेली दिसून येते,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
‘पुनर्बांधणीचे ₹3000 कोटी आणि सौम्यीकरण उपाययोजनांचे ₹7000 कोटी असे 10 हजार कोटी रुपये हे दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये मोडतात. त्यामुळे प्रत्यक्ष मदत ही 1500 कोटी रुपयांचीच दिसून येते. यासोबतच, राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकाचे अवलोकन केले असता शेतीपिकांचे नुकसान, अन्नधान्य पुरवठा, स्वच्छता अनुदान, घरांसाठी वाळू-मुरूमची उपलब्धता अशा 2019 मध्ये देण्यात आलेल्या अनेक मदतींचा त्यात उल्लेख दिसून येत नाही,’ असा मुद्दा देखील त्यांनी मांडला.
पुढे त्यांनी, ‘या मदतीबाबतचा विस्तृत शासन आदेश जारी झाल्यानंतरच याबाबतची स्पष्टता आल्यानंतरच सविस्तर प्रतिक्रिया देता येईल. प्रथमदर्शनी तरी शेतकऱ्यांसह महत्त्वाच्या घटकाला कुठलीही मदत केलेली दिसून येत नाही,’ अशी टीका देखील केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! पूजा चव्हाणने आत्मत्येपूर्वी मद्य प्राशन केले होते; केमिकल अँनालायसेसचा अहवाल
- ‘महाविकास आघाडी सरकार पूरग्रस्तांची अजून किती थट्टा करणार?’, प्रवीण दरेकरांचा संतप्त सवाल
- ‘बेल बॉटम’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून लारा दत्ताला ओळखणे झाले कठीण; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
- ‘वर्क फ्रॉम होम, खरेदीला वेळ देणार कोण’! पुण्यात व्यापाऱ्यांचे घंटानाद आंदोलन
- टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक, पहिल्याच प्रयत्नात यशस्वी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

