अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमोण येथील ग्रामपंचायतने केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी सुधारणा कायद्यास समर्थन दिले आहे. तशा आशयाचा ठराव देखील निमोण ग्रामपंचायतच्या मासिक सभेत मंजूर करण्यात आला आहे.
निमोण ग्रामपंचायतच्या नुकत्याच प्रभारी सरपंच दगडू मुरलीधर घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेत ग्रामपंचायत सदस्य अशोक कराड यांनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी सुधारणा कायद्यास समर्थन देण्याचा ठराव मांडला. त्यावर मासिक सभेत चर्चा झाली. केंद्र सरकारने तीन नवीन कृषी विषयक कायदे मंजूर केलेले असून ते शेतकरी हिताचे आहेत, यावर मासिक सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर कृषी सुधारणा कायद्यास समर्थन देणारा ठराव मंजूर करण्यात आला.
या ठरावाची सूचना ग्रामपंचायत सदस्य अशोक कराड यांनी मांडली, त्यास मुश्ताक सुभेदार यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे केंद्रीय कृषी सुधारणा कायद्यास समर्थन देणारी निमोण ग्रामपंचायत नगर जिल्ह्यात पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
महत्वाच्या बातम्या
- आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘गोड बातमी’ मिळण्याची शक्यता
- प्राचीन मंदिरांचे संवर्धन करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभागृहात घोषणा
- पवार साहेबांप्रमाणे प्रचंड काम करणारा नेता देशात दुसरा कुणी नाही – अजित पवार
- अशोक चव्हाणांसारखा निष्क्रिय माणूस आजपर्यंत पाहिला नाही- विनायक मेटे
- दिल्लीच्या सीमेवरुन आंदोलकांना हटविण्याच्या याचिकेवर आज होणार सुनावणी


