🕒 1 min read
मुंबई –राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचं निधन झालं. कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास सुरु झाला. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना रात्री साडे बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके हे 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पुत्र भगीरथ, तीन विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे.
भारत भालके यांना कोविड-19 झाला होता. त्यातून ते बरेही झाले होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना उपचारांसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे दाखल करण्यात आलं होतं. मात्र न्युमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती ढासळत गेली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (27 नोव्हेंबर) हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली होती. रात्री साडे बारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांच्या निधनाची बातमी अत्यंत क्लेशदायक असून सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीने झटणारा लोकनेता आज हरपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने चांगला लोकप्रतिनिधी, मी निकटचा सहकारी गमावला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतनाना भालके यांना श्रद्धांजली वाहिली.
भारतनानांचे नेतृत्व हे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील जनतेच्या सुख-दु:खांशी एकरुप झालेलं नेतृत्व होतं. मतदारसंघातल्या गावागावात, घराघरात त्यांचा लोकसंपर्क होता. पंढरपूर-मंगळवेढ्यातल्या दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्यासह भागाच्या विकासासाठी त्यांनी तळमळीने काम केले. सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठीही त्यांनी सातत्याने आवाज उठवला. जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठीही त्यांचा प्रयत्न असायचा. शेतकरी, कष्टकरी, वंचित, उपेक्षित, समाजातल्या दुर्बल घटकांचा विकास केंद्रस्थानी ठेवून राजकारण, समाजकारण करणारे त्यांचे नेतृत्व होते. भारतनाना भालके यांचे अचानक निघून जाणे ही पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील जनतेची, राष्ट्रवादी काँग्रेसची व माझीही वैयक्तिक हानी आहे, अशी शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील सरकोली या गावातील शेतात आमदार भारत भालके यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. पुण्याहून सकाळी सात वाजता पंढरपूर तालुक्यातील सरकोली या गावाकडे पुण्याहून निघेल. सकाळी अकरापर्यंत गावी पोहोचेल. यानंतर चार वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव घरासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवला जाईल. दुपारी चार वाजता याच ठिकाणी त्यांच्या शेतात भालके यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
महत्वाच्या बातम्या
- ‘ईडीची कारवाई ही ऑपरेशन कमळची सुरुवात’
- पंतप्रधान मोदी पुण्यात येणार मात्र ‘छोटे भाई’ उद्धव ठाकरे राहणार अनुपस्थित !
- प्रताप सरनाईक यांच्या ईडी कारवाईवर, सचिन सावंत यांचा फडणवीसांना थेट सवाल
- वुहानचा व्हायरस त्याला भारी पडणार ‘पुनावाला सायरस’, पवारांच्या वर्गमित्राची सिरम !
- ईडीचा धडाका सुरूच : विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांची १० तास चौकशी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

