बीड : येथील नगर परिषदेच्या विकास कामावरून क्षीरसागर काका पुतण्यात पुन्हा जुंपली आहे. शिवसेनेच्या ताब्यातील बीड पालिकेतील विकास कामात जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर नाहक खोडा घालत असल्याच आरोप नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केला आहे.
यामुळे नगरपालिका निवडणुकीच्या अगोदर बीडमधील राजकीय वातावरण तापले आहे. विकास कामे करू दिले नाही तर आमदार व पालकमंत्र्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिला आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीवर आरोप केलेत.
विकासाची नवी संकल्पना घेऊन या पाच वर्षांच्या काळात आपण केवळ बीडच्या जनतेला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न करून मोठा निधी उपलब्ध करून घेतला. अण्णांच्या माध्यमातून अमृत अटल आणि भुयारी गटार योजना मंजूर करून त्याचेही काम सुरू केले. झालेल्या कामानंतर नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी विविध योजनेतून निधी मंजूर करून घेतला. मात्र, सुडाचे राजकारण करणाऱ्या स्थानिक आमदार, पालकमंत्री यांनी नगर पालिकेच्या संविधानिक हक्क हिसकावून घेत बीड शहरात होणारी विविध विकास कामे अडवली आहेत. ही बाब आता जनतेने लक्षात घेऊन जाब विचारायला हवा, असे परखड मत नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी मांडले.
दिलेल्या वचनानुसार विविध योजनेच्या माध्यमातून निधी मंजूर करून घेतला आहे. मात्र ही कामे जर झाली तर आता येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा आपल्याला जनता मागे फेकेल, या भीतीने स्थानिक आमदारांनी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून बीड नगरपालिकेला आलेला प्रत्येक निधी अडवण्याचा प्रयत्न केला आहे. गोरगरिबांना मिळणाऱ्या शेकडो घरकुलांची कामे याच आमदारांनी अडवून ठेवले आहेत. तसेच शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजना राबवण्यासाठी कार्यान्वयन यंत्रणा म्हणून नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, हे काम होऊ नये म्हणून हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर स्थानिक आमदारांनी अजूनही दुसरे उपद्व्याप सुरू केल्याचा आरोप नगराध्यक्ष क्षीरसागर यांनी याप्रसंगी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अधुरी एक कहाणी! ‘या’ कारणामुळे राष्ट्रवादीकडून राजू शेट्टींना ‘दे धक्का!’
- मराठा आरक्षणातील अडसर दूर होणार ? संभाजीराजेंनी राष्ट्रपतींकडे केल्या ‘या’ २ महत्वाच्या मागण्या
- संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून कोरोनामुक्त वार्ड करा – गोऱ्हे
- बारामती नगरपरिषदेच्या ठरावाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
- ‘काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होतंय, फटका माझ्यासारख्याला बसतो’


