अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. एकत्र जमल्यानंतर प्रत्येकाने मास्क घातला पाहिजे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र लोकप्रतिनिधीच या आदेशाचं पालन करत नसल्याचं दिसत आहे. कोणतेही नियम न पाळत वाढदिवसाला गर्दी करणारे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित खोसे, बाबा गाडळकर, संतोष ढाकणे, माऊली जाधव यांच्यासह 25 ते 30 कार्यकर्ते आयुर्वेद कॉलेज परिसरातील आमदार जगताप यांच्या कार्यालयासमोर जमले होते. जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी मास्क घातलेले नव्हते. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्याच्या गोपनीय शाखेतील कर्मचारी सचिन गोरे यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
फिर्यादीत म्हटले आहे, की 12 जून 2020 रोजी दुपारी बाराच्या सुमारास आमदार जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त हे लोक एकत्र आले होते. जगताप यांच्यासह या कार्यकर्त्यांनी मास्क घातलेले नव्हते. त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. गोरे यांच्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम 188 व 269 अन्वये जगताप यांच्यासह 25 ते 30 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे
दरम्यान,आमदारांनी कार्यक्रमाचे आयोजन केले नव्हते तर कार्यकर्ते प्रेमापोटी भेटीला आले होते, असा दावा आता आमदार जगताप यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे वारंवार सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे आवाहन करत आहेत. कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाच्या विळख्यातून लवकरात लवकर बाहेर पडावं यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचेच आमदार सर्व नियम धाब्यावर बसून वावरत असतील तर त्यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा? असा सवाल आता विचारला जात आहे.
क्रीडाविश्वात हळहळ! भारताचे महान हॉकीपटू बलबीर सिंग यांचे निधन
मुलाच्या लग्नाची पार्टी भोवली; कॉंग्रेस नेत्यासह सर्वपक्षीय नेत्यांच्या अडचणी वाढल्या
पुणे जिल्ह्यातून १ हजार १३१ नागरिक विशेष रेल्वेने लखनौकडे रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

