नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. राणेंना मंत्रिपदाचा शपथ घेण्याचा पहिला मान देखील देण्यात आला. त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्रिपद देण्यात आले आहे.
शिवसेनेच्या शाखाप्रमुखापासून सुरुवात झालेला राणेंचा प्रवास हा कायमच चर्चेत राहिला आहे. शिवसेनेकडून सुमारे आठ महिने मुख्यमंत्रीपद सांभाळल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने त्यांना राज्यातील मंत्रिपद देखील दिलं होतं. नंतरच्या काळात त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. यानंतर काहीच महिन्यात त्यांनी भाजपात प्रवेश केला. आता त्यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लावण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्रिपद सोपवून भाजपने विश्वास दाखवल्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचे देखील आभार मानले. त्यांच्यामुळेच आपल्याला मंत्रिपद मिळाल्याचे नारायण राणे यांनी म्हटले होते. आता त्यांनी एका पत्राद्वारे हितचिंतकांचे आभार मानले आहेत.
‘केंद्रीय मंत्रिपदापर्यंतच्या राजकीय वाटचालीत सर्वांचे जे प्रेम आणि सहकार्य मिळाले आहे त्याचे ऋण मी या जन्मी फेडू शकेन काय?’ असा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारला असून या पत्राद्वारे त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
नारायण राणे आपल्या पत्रात नेमकं काय म्हणतात ?
केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळाली असे नमूद करत राणे यांनी शुभेच्छा देणाऱ्या सर्वांना धन्यवाद दिले. केंद्रात मंत्री झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून, प्रत्येक जिल्ह्यातून, सर्व पक्षांचे पदाधिकारी, नेते तसेच भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांनी मला फोन करून आणि अन्य मार्गाने माझे अभिनंदन केले व मला शुभेच्छा दिल्या.
काही जणांनी देवाजवळ प्रार्थनाही केल्या. आपल्या या प्रेमाबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो, अशा भावना राणे यांनी या पत्रातून मांडल्या आहेत. तुमच्या प्रोत्साहनामुळेच मी येथवर पोहचू शकलो. भविष्यातही आपल्याकडून असेच प्रेम, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळत राहो, ही नम्र अपेक्षा. आपल्या माझ्यावरच्या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. महाराष्ट्रातील सर्व नेते, हितचिंतक, मित्र व कार्यकर्ते या साऱ्यांनी दिलेले प्रेम व सहकार्य याचे ऋण मी या जन्मी फेडू शकेल का?, असा प्रश्न माझ्या मनात दाटला आहे, अशा हृद्य भावना व्यक्त करताना भविष्यात प्रत्यक्ष भेटू व बोलू, असं देखील राणे यांनी पत्राच्या शेवटी नमूद केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘२३ गावांच्या नव्या डीपीचा हट्ट कशासाठी, गावांच्या विकासासाठी की बापटांना विरोधासाठी ?’
- ‘शिवसेनेलाच आता युतीची गरज असेल’; निलेश राणेंचा टोला
- ‘गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांचा भाजपाने वापर करुन नंतर त्यांना डावलले’
- कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका, औरंगाबाद पालिका ९२१ बेडसह सज्ज!
- ‘पडळकरांनी पात्रता ओळखून भाष्य करावं, तोंडाला येईल ते बोलून स्वतःचा पचका करून घेऊ नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
