मुंबई : राज्य सरकारने मंदिर खुली करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. मंदिरं उघडण्याबाबत रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नकारात्मक संकेत दिल्यानंतर भाजप पुन्हा आक्रमक झाला आहे. मंदिरं खुली करण्यासाठी राज्यभरात भाजपकडून लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना पात्र लिहून मंदिरं खुली करण्यावरून खडेबोल सुनावले आहेत.
‘तुम्ही कट्टर हिंदुत्त्ववादी आहात. प्रभू श्रीरामांप्रती तुमची श्रद्धा तुम्ही जाहीरपूर्वक दाखवली होती. राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तुम्ही अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शनही घेतलं होतं. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरालाही तुम्ही भेट दिली होती. मंदिरं बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की ज्या ‘सेक्युलर’ शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता तो ‘सेक्युलर’ शब्द तुम्ही स्वीकारला आहे.’ असं म्हणत त्यांनी मंदिरं खुली करण्यावरून उद्धव ठाकरेंना जाहीर पत्र पाठवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर, राज्यपालांच्या या पत्राला उद्धव ठाकरे यांनी देखील लगेच प्रत्युत्तर दिलं आहे,
“प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. याबद्दल सरकार जरुर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सध्या राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सूचना देणे, जनजागृती करणे, आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी करुन दिली.
माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही!
“आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का?
मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे. आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही. इतर राज्यात, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे” असेही उद्धव ठाकरेंनी सुनावले.
“आपण म्हणता गेल्या तीन महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील तीन पत्रे आपण सोबत जोडली आहेत. ही तिन्ही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करत असून सर्व काळजी घेऊन लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल ही खात्री मी आपल्याला देतो” असं सडेतोड प्रत्युत्तर ठाकरेंनी राज्यपालांना दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
- ‘तुम्ही सेक्युलर झाला आहात का?’ राज्यपालांचा उद्धव ठाकरेंना सवाल
- मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे आंदोलन, प्रविण दरेकर-प्रसाद लाड पोलिसांच्या ताब्यात
- धक्कादायक! राज्यात तब्बल साडे 12 लाख सदोष RTPCR किट्स वितरित,टोपेंची कबुली
- ‘ऊर्जामंत्र्यांनी इतर राज्यात लक्ष देण्याऐवजी आपल्या खात्याच्या कारभारावर लक्ष देणे गरजेचे’
- महिलांवरील अत्याचार थांबेपर्यंत आघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही; पाटील यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

