टीम महाराष्ट्र देशा : राजस्थानमधील वडमेर येथील सभेतील “भारताकडे असलेले अणुबॉम्ब दिवाळीमध्ये वापरण्यासाठी ठेवलेले नाहीत”. या विधानासाठी निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चिट दिली आहे. दरम्यान, मोदींच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. परंतु मोदींचे हे वक्तव्य आदर्श आचासंहितेचे उल्लंघन नसल्याचे सांगत निवडणूक आयोगाने ही क्लीन चीट दिली आहे.
नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या विविध विधानांवरुन काँग्रेसने मोदींविरोधात एकूण ११ तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यापैकी ३ तक्रारींचा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. तीनही वेळा निवडणूक आयोगाने मोदींना क्लीन चिट दिलेली आहे.
तर दुसरीकडे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना न्यायालयाने अजून एक दणका दिला आहे. काही दिवसांपूर्वी केलेल्या एका वादग्रस्त विधानाबद्दल त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ‘सर्व चोरांचे एकच आडनाव मोदी कसे असू शकते?’ अशा आशयाचं विधान त्यांनी काही दिवसांपूर्वी नीरव मोदी आणि ललित मोदी यांचा संदर्भ देत केलं होतं.
मोदी आडनावाबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी गुजरातमधील भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी १६ एप्रिल रोजी राहुल गांधी यांच्या विरोधात भादंवि संहिता कलम ४९९ व ५०० अंतर्गत बदनामीबद्दल फौजदारी तक्रार दाखल केली होती. त्यामुळे न्यायालयाने ७ जून रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
दरम्यान, या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांच्या बेताल वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात देशात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कॉंग्रेसला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.


