मुंबई : दिवसेंदिवस राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. देशभरातील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. तर दुसरीकडे ही राजकारणाची वेळ नाही असं वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगत आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, ‘मुख्यमंत्र्यांनी राजकारण करु नये हा सल्ला पहिल्यांदा सामना संपादकांना द्यावा,’ असा खोचक सल्ला भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला आहे.
विरोधकांनी राजकारण करू नये इति मा.मु.@OfficeofUT
विरोधकांनी करू नये, आम्ही मात्र रोज सामानातून शिमगा करणार, चिखलफेक करणार, कोरोनाची आकडेवारी आणि वाढता धोका वगळून सर्व विषयांवर बोलणार. साळसूदपणाचा आव आणून शहाजोग सल्ले ही देणार. जनता झापडबंद आहे असे मानून डोळे बंद करून दूध पिणार. pic.twitter.com/JssrA73SxH— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 26, 2020
पुढे ते म्हणतात, ‘महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढते, मृतांची संख्या वाढतेय. त्यामुळे जनतेत जाऊन कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केला तर चांगले होईल, आपल्या सहकाऱ्याच्या नथीतून तीर मारावे हे उद्योग बंद करावेत,’ असा टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे. ट्विट करत शेलार म्हणतात, ‘आपण फेसबुकवरुन राजकारण करु नका, असा जो उपदेश केलात तो सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना केलात तर बरं होईल,’ असा सल्ला शेलार यांनी दिला आहे.


