नागपूर : काही दिवसांपूर्वी आपल्याच सरकावर कर्जमाफीच्या मुद्यावरून टीका करणारे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत उद्धवजींनी अतिशय चांगले निर्णय घेतले असले तरी ही कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या समस्येवरील उपाय नाही. कर्जमाफी म्हणजे जखम डोक्याला आणि पट्टी मस्तकाला, असा प्रकार असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू आज रवीभवन येथे म्हणाले आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून कडू यांनी मोदी सरकारवर देखील तोफ डागली. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला तरच त्यांच्या समस्या सुटू शकतील. मोदीजींनीही शेतकऱ्यांचा 50 टक्के लाभ धरून त्यांना हमीभाव दिला जाईल, अशी घोषणा केली होती. पण ती अंमलात आली नाही. त्यामुळे आजही शेतकरी होता त्याच स्थितीत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे मिळून यावर उपाय काढला पाहिजे. तरच शेतकऱ्यांसाठी काही करता आलं असं आपण म्हणू शकू, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात बच्चू कडू जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला आणि बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या विभागांचे राज्यमंत्री आहेत.
दरम्यान,देवाची आळंदी येथे वारकऱ्यांच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलतांना अचलपूरचे आमदार आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीवर भाष्य केलं होत. सरकारच्या धोरणांमुळे जे शेतकऱ्याच नुकसान झालं आहे ते अगणित आहे. त्याचा आपण अंकात विचार करू शकत नाही. तसेच माझ्या मते दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं आहेत, असं विधान कडू यांनी केलं होतं.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

