मुंबई : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राने राज्यात मोठा सत्तासंघर्ष पाहिला. शिवसेनेतील अंतर्गत बंडखोरीमुळे राज्यातील राजकीय चित्र पूर्णपणे पालटलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या ३९ आमदारांनी पाठिंबा दिला. हे सर्व ३९ आमदार आणि अपक्ष ११ आमदार सोबत घेऊन शिंदे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले. यानंतर ठाकरे सरकार कोसळले. भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यानंतर शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता आणखीन एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्ष पूर्णपणे विखुरला गेला आहे. उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घ्यावे, असं शिवसेनेच्या खासदारांना वाटत आहे. तशी मागणी या खासदारांनी उद्धव ठाकरे यांना बोलून दाखवल्याचं सांगितलं जात आहे. तसेच सेनेचे 14 खासदार वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याने केला आहे. यानंतर आता खासदार देखील शिंदेंना पाठींबा देणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी हा सगळ्यात मोठा बॉम्ब फोडून महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरे दिले आहेत. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. मात्र शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर करून भाजपने मोठी खेळी केली आहे. शिंदे यांना मुख्यमंत्री करून भाजपने शिवसेनेत संभ्रम आणि एकाचवेळी भाजपबाबत सहानुभूती निर्माण केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

